उमेदवारांच्या घोषणेकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष

By Admin | Updated: January 18, 2017 00:48 IST2017-01-18T00:48:14+5:302017-01-18T00:48:14+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अद्यापही एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

The attention of the rural voters in the announcement of the candidates | उमेदवारांच्या घोषणेकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष

उमेदवारांच्या घोषणेकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष

चाचपणीच सुरू : उमेदवारांच्या गर्दीमुळे भाजपला बंडखोरीची भीती

राजेश भोजेकर   वर्धा
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अद्यापही एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे ग्रामीण मतदारांमध्ये उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झालेली आहे. भाजपकडे उमेदवारांची मोठी यादी आहे. ही यादीही भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्ष सत्तेत आणि पक्षाचे अच्छे दिन असल्यामुळे ही बाब पक्षश्रेष्ठींसाठी आनंददायी असली तरी एका जिल्हा परिषद मतदार संघातून एकालाच उमेदवारी द्यायची असल्यामुळे बंडखोरीची भीतीही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेम्यात पाहिजे तशी चहलपहल दिसत नाही. मात्र वरिष्ठ पातळीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर आलेली आहे. याच अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनीही आघाडीसाठी पुढाकार घेणे सुरू केल्यामुळे नवे राजकीय समीकरण भाजपसाठी चिंतेची बाब ठरण्याची चिन्हे आहेत.
वर्धा जिल्ह्यात भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनाही स्वबळावर काही जागा लढविण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे वजन नसल्यामुळे भाजप शिवसेनेकडे ढुंकूनही बघायला तयार दिसत नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास भाजपला शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेली मतेही धोक्याची घंटा ठरण्याची भीती आहे.
बसपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. परंतु नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत बसपाने पुलगाव पालिकेत पाच सदस्य निवडून आणले. ही बाब बसपा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी असली तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा चमत्कार करणे बसपासाठी वाटते तितके सोपे नाही.
फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले महादेव जानकर यांचा शेकाप पक्ष वर्धा जिल्ह्यात वाढोणा-पिंपळखुटा जि.प. मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. यासोबतच रिपाइं(आठवले गट) सेवाग्राम जि.प. मतदार संघातून आपले भवितव्य आजमावणार असल्याचे संकेत आहे. अन्य राजकीय पक्षही आपआपल्या परीनेव ही निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहे. मात्र एकाही पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: The attention of the rural voters in the announcement of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.