नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडे जनतेचे लक्ष
By Admin | Updated: October 27, 2016 00:45 IST2016-10-27T00:45:12+5:302016-10-27T00:45:12+5:30
जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी...

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडे जनतेचे लक्ष
राजकीय पक्षांची माथापच्ची : तिकिटासाठी इच्छुकांचे मुंबईत ठाण
वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी, यावरून पक्षश्रेष्ठींची पाथापच्ची सुरू असल्याची माहिती आहे.
नगराध्यक्षपदाची निवड थेट जनता निवडणुकीच्या माध्यमातून करणार असल्यामुळे या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही वर्धा व हिंगणघाट सर्वसाधारण तर पुलगाव येथे हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने अनेकांना नगराध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहे.
राजकीय पक्षाची तिकीट मिळाल्यास हा राजयोग सोपा होईल, ही बाब लक्षात घेऊन पक्षातील मंडळींसह इतरही मंडळींनी राजकीय पक्षांकडे तिकीट मागून फिल्डींग लावणे सुरू केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय पक्षांकडे नगराध्यक्षपदाचा दमदार उमेदवार नसल्यामुळे पश्रक्षेष्ठी नव्या चेहऱ्यांना चाचपडून बघत असल्याची माहिती आहे. यामुळे उमेदवारीचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे समजते. दुसरी बाब म्हणजे, आधीच उमेदवार जाहीर केल्यास बंडखोरीची शक्यता अधिक आहे. हा धोकाही राजकीय पक्ष पत्करण्यास तयार नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
राजकीय पक्षांचे उमेदवार मुंबईत ठरणार असल्यामुळे जवळपास सर्वच प्रमुख पक्षांकडील इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.(जिल्हा प्रतिनिधी)