सायकल जंगलभ्रमंतीने वेधले जिल्हावासीयांचे लक्ष
By Admin | Updated: August 10, 2015 01:42 IST2015-08-10T01:42:42+5:302015-08-10T01:42:42+5:30
बहार नेचर फाउंडेशनच्या सायकल जंगल भ्रमंतीच्या सदस्यांनी १२० किलोमीटरची सायकल परिक्रमा करीत संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष वेधले.

सायकल जंगलभ्रमंतीने वेधले जिल्हावासीयांचे लक्ष
वर्धा : बहार नेचर फाउंडेशनच्या सायकल जंगल भ्रमंतीच्या सदस्यांनी १२० किलोमीटरची सायकल परिक्रमा करीत संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष वेधले. वन्यजीव आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या निसर्गप्रेमी सायकलस्वारांना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सायकल भ्रमंती यात्रेचा आरंभ सामाजिक वनीकरण उपसंचालक बी.एच. बडगे व हिंगणघाटचे लागवड अधिकारी अरविंद सरदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या दिवशी सायकलस्वारांनी खरांगणा येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट देत आपली भूमिका मांडली. त्यानंतर महाकाळी येथे भोजन व विश्रांती घेत सायकलस्वार मासोद या गावी रवाना झाले.
मासोद येथील तलावावर या चमूने पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. तसेच गावकऱ्यांशी संवादही साधला. रात्री झालेली परस्पर परिचयाची मैफल आणि काव्य-गायनाची बैठक दिवसभराचा थकवा घालविणारी होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलस्वारांची वाटचाल ढगा भुवनाकडे सुरू झाली. दुतर्फा असणाऱ्या वनराईचा आनंद घेत आणि वाटसरुंशी संवाद साधत ढगा येथील निसर्गरम्य परिसरात ही निसर्ग जागर यात्रा दाखल झाली. रत्यातील आडवळणाच्या गावांना भेट देत माळेगाव ठेका येथील मदन जलाशयावर ही यात्रा काही काळाकरिता विसावली. या वाटचालीत पाण्याचा साठा असणाऱ्या काही स्थळांवर फळझाडांच्या बियांची पखरणही करण्यात आली. निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करीत बोरखेडीे, जामनी मार्गे बहारची सायकल चमू वर्ध्यात परत आली. यावेळी समारोपाच्या सत्राला उपस्थित राहून सामाजिक वनीकरण उपसंचालक बी.एच. बडगे यांनी संपूर्ण चमूचे स्वागत केले.
या सायकल परिक्रमेत बहार नेचर फाऊंडेशनचे किशोर वानखडे, रवींद्र पाटील, दिलीप वीरखडे, दीपक गुढेकर, डॉ. बाबाजी घेवडे, जयंत सबाने, वैभव देशमुख, प्रा. मोहन गुजरकर, आशिष गोलाईत, निखील खोडे, आशिष नाखले, विशाल बाळसराफ, दर्शन दुधाने, सुपर्ण देशमुख, ललित खोडे हे सायकलस्वार सहभागी झाले होते.
नियोजन पथकात संजय इंगळे तिगावकर, रमेश बाकडे, राहुल तेलरांधे, स्रेहल कुबडे यांचा सहभाग होता. सुरक्षा पथकात पराग दांडगे, डॉ. जयंत वाघ, डॉ. सुप्रिया गोमासे, सारिका मून, नम्रता सबाने यांनी योगदान दिले.
या उपक्रमाला किशोर माथनकर, जिल्हा उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा, खरांगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन बोबडे, तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले, दिनकर पाटील, ईश्वर आदींनी सहकार्य केले. परिसरातील नागरिकांसाठीही ही सायकल भ्रमंती नाविण्यपूर्ण होती.(शहर प्रतिनिधी)