ग्रामीण रुग्णालये जीवनदायी योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:53 IST2016-10-16T01:53:32+5:302016-10-16T01:53:32+5:30

वडनेर येथील ग्रामीण रुग्णालय आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाला राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

Attempted to include rural hospitals in the life insurance scheme | ग्रामीण रुग्णालये जीवनदायी योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नरत

ग्रामीण रुग्णालये जीवनदायी योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नरत

किशोर तिवारी : रिक्त पदांबाबत व्यक्त केली नाराजी
वर्धा : वडनेर येथील ग्रामीण रुग्णालय आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाला राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णालयामध्ये सर्व आवश्यक व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी त्वरित प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.
वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डी.जी. चव्हाण, तहसीलदार सचिन यादव, सहायक गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी विनोद वाघमारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक वनकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तिवारी यांनी दररोज २०० ते ३०० बाह्य रुग्ण असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एकही वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरलेले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. वैद्यकीय अधीक्षकाकडून त्यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधी, किरण मशीन आणि इतर सोई-सुविधांची माहिती जाणून घेतली.
तहसीलदार सचिन यादव यांच्याकडून शेतकरी आत्महत्यांबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. पाच शेतकरी आत्महत्या झालेल्या गावांवर अधिक लक्ष देण्यात यावे. तसेच संपूर्ण तालुका शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही यावेळी तिवारी यांनी दिल्या. बँक आॅफ इंडियाचे वडनेर येथील शाखेच्या व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Attempted to include rural hospitals in the life insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.