आमदाराचा प्रतिकात्मक पुतळा विसर्जनाचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: February 14, 2017 01:30 IST2017-02-14T01:30:26+5:302017-02-14T01:30:26+5:30
सिंदी (मेघे) भागातील भाईमारे ले-आऊट परिसरातील नाल्यावरील खचलेल्या पुलाची डागडुजी करावी, ...

आमदाराचा प्रतिकात्मक पुतळा विसर्जनाचा प्रयत्न फसला
नऊ आंदोलनकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
वर्धा : सिंदी (मेघे) भागातील भाईमारे ले-आऊट परिसरातील नाल्यावरील खचलेल्या पुलाची डागडुजी करावी, अशी येथील नागरिकांची मागणी होती. हा पूल धोकादायक असून त्याची तात्काळ दुरूस्ती करावी म्हणून वारंवार निवेदन देण्यात आले. या मागणीची पूर्तता न झाल्याने युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी या खचलेल्या पुलात आमदाराचा प्रतिकात्मक पुतळा विसर्जित करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.
सिंदी (मेघे) भागातील भाईमारे ले-आऊट भागातील रहिवाशांनी तेथील खचलेल्या पुलाच्या दुरूस्तीकरिता जिल्हाधिकाऱ्यांसह आमदारांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारताना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सदर जीवघेणा ठरणाऱ्या पुलाची तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल, अशी आश्वासन दिले होते. परंतु, याला बराच कालावधी लोटूनही आश्वासनाची पूर्तत: न केल्याने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर हे आंदोलन केले. पोलिसांनी निहाल पांडे, पलाश उमाटे, विजय आगरे, गौरव वानखेडे, अक्षय बाळसराफ, सोनु हाते, अमीत भोसले, भाष्कर सोनटक्के, प्रमोद बेलेकर यांना ताब्यात घेत रामनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध ६८ बी.पी. कायद्यानुसार कारवाई करून सुटका करण्यात आली.
श्रेय लाटण्यासाठी उमेदवारही पोहचले
सदर आंदोलनाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने काही राजकीय पक्षाचे पुढारी व जि.प. व पं.स निवडणूक रिंगणातील उमेदवार श्रेय लाटण्याकरिता आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आंदोलनाला प्रतिसाद पाहुन काही उमेदवारांनी आपण निवडून येऊ वा नाही. परंतु, पुलाची दुरूस्ती नक्कीच करू, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.