भयमुक्त समाजासाठी प्रयत्न
By Admin | Updated: October 22, 2015 03:49 IST2015-10-22T03:49:00+5:302015-10-22T03:49:00+5:30
समाजात शांतता कायम ठेऊन नागरिकांना अभय देण्याचे कार्य पोलीस प्रशासन करतात. मात्र पोलिसांबाबत असलेल्या

भयमुक्त समाजासाठी प्रयत्न
श्रेया केनेल्ल वर्धा
समाजात शांतता कायम ठेऊन नागरिकांना अभय देण्याचे कार्य पोलीस प्रशासन करतात. मात्र पोलिसांबाबत असलेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद लोप पावतो. यामुळे गुन्हे अधिक प्रमाणात घडतात. पोलिसांना मित्र म्हणून स्वीकारले जाऊन भयमुक्त समाजाकरिता प्रयत्नरत असलेल्या पोलीस उपअधीक्षक स्मिता पाटील आहेत आजची स्त्री शक्ती.
कृषी अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर स्मिता पाटील यांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. यातही पोलीस प्रशासनातील सेवेला त्यांची पसंती असल्याने त्या दिशेने तयारी सुरू केली. यात घरातील वातावरण पुरक असल्याने त्यांनी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. मूळच्या सोलापूरकर असलेल्या स्मिता यांचे शिक्षण नागपूर, अकोला येथे झाले. परिविक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांची वर्धा येथे नियुक्ती झाली होती. याकाळात त्यांनी दारूबंदी मोहीम धडाक्यात राबविली. कारवाई करताना आलेल्या अडचणीवर तेवढ्याच हिमतीने मात केली. गुन्हेगारांवर कारवाई करताना त्यांनी कधीच कच खाल्ली नाही. मोक्का अंतर्गत कारवाई करुन प्रसंगी गोळीबारही केला. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे, महिला सशक्तीकरण, सामाजिक सलोखा, पोलिसांचे मनोबल उंचावण्याकरिता विविध उपक्रम राबविणे या क्षेत्रातही त्या सक्रीयपणे कार्यरत आहे.
वाचनाची आवड जोपासताना त्या पाकशास्त्रातही नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्सुक असतात. सोपविलेली जबाबदारी अंगीभूत क्षमतेसह पार पाडण्याचा त्या नेहमी यशस्वी प्रयत्न करतात.