कर्मचाऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा
By Admin | Updated: July 12, 2015 02:25 IST2015-07-12T02:25:29+5:302015-07-12T02:25:29+5:30
लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्यसेविका व सेवकाला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील चंगेरा येथे ८ जुलै रोजी घडली.

कर्मचाऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा
वर्धा : लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्यसेविका व सेवकाला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील चंगेरा येथे ८ जुलै रोजी घडली. यात आरोग्य सेविका साधना लांजेवार, कंत्राटी आरोग्य सेविका छाया गायकवाड व आरोग्य सेवक सूर्यभान नागदेवे हे थोडक्यात बचावले. त्यामुळे घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
चंगेरा येथे बुधवारी ८ जुलै रोजी लसीकरण होते. यावेळी साधना लांजेवार, छाया गायकवाड आणि सूर्यभान नागदेवे लसीकरणाचे काम करीत होते. चंगेरा येथील सायना जमीर मिर्झा या महिलेची प्रसूती गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे मंगळवारी ७ जुलै रोजी झाली होती. बुधवारी तिच्या बाळाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या नवजात बाळाला अतीदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु घरच्यांनी त्या बाळाचा उपचार न होवू देताच घरी नेले आणि ८ रोजी चंगेरा येथील अंगणवाडीत सुरू असलेले लसीकरणात नवजात शिशूलाही पोलिओ व बीसीजी लसीकरण दिले. बाळाची प्रकृती बरी नसतानाही सदर बाळाला घरी घेवून आल्याची बाब उपस्थित लसीकरणातील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील लोकांनी सांगितली. या लसीकरण केंद्रात पोलिओ व बीसीजी लस तीन बालकांना देण्यात आले. सायना मिर्झा हिच्या बाळालाही लस देण्यात आली. परंतु प्रकृती खालावल्यामुळे बाळाला गंगाबाई स्त्री रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र घरच्यांनी गंगाबाई रुग्णालयात न नेता रजेगाव(मध्यप्रदेश) येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
ही बाब मृताच्या घरच्या लोकांना कळताच त्यांनी काही लोकांच्या मदतीने लसीकरण केंद्र सुरू असलेली अंगणवाडी गाठून उपस्थित असलेल्या तिनही आरोग्य कर्मचाऱ्यांना हातात मिळेल त्या वस्तूंने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना व्हॅक्सीनच्या डब्यांनी ते डबे फुटेस्तोवर मारहाण करण्यात आली.
विशेष म्हणजे बेदम मारहाणीनंतर रॉकेल आणून सदर आरोग्यसेवकांना जाळून मारेकऱ्यांचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र वेळीच रावणवाडी पोलीस घटना स्थळी दाखल झाल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने निशेष नोंदविण्यात आला. तसेच आरोपींना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्णपणे संरक्षण मिळेल याची हमी शासनानी घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात संघटनेच्या जिल्हा शाखा उपाध्यक्ष सुजाता कांबळे, संजय डफळे, सचिव दीपक कांबळे, रेवतकर, कन्हेर यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)