लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश सज्जन यांच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही-सास्ताबाद पांदण रस्ता मार्गावर घडली. सदर प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये जांगोणा येथील सरपंच नीतीन वाघ यांचा समावेश आहे.वर्धा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वाळू माफियांकडून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. अवैधपणे उत्खनन केलेली वाळूची वनजमिनीतून तयार केलेल्या रस्त्याने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या दोन चमू हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही शिवाराकडे रवाना झाल्या. या चमूतील काही वनकर्मचारी दुचाकीने होते. दुचाकीने वाळू माफियांचा शोध घेणाऱ्यांमध्ये वनरक्षक मुनेश्वर सज्जन व सदाशिव माने यांचा समावेश होता. खाकीवदीर्तील वनरक्षक कारवाईसाठी आल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने सज्जन यांच्या एम. एच. ३२ ए.एल. ५०५२ क्रमांकाच्या दुचाकीला धडक देत त्यांना जमिनीवर पाडले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोबत असलेला अतिज्वलनशील पदार्थ सज्जन यांच्या अंगावर टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सज्जन यांनी आरडा-ओरड केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी वनरक्षक मुनेश सज्जन यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाळू माफिया उबालू कुबडे रा. पोहणा, जांगोनाचे सरपंच तथा वाळू माफिया नितीन वाघ रा. जांगोणा यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर भादंविच्या कलम ३०७, ३५३, ३३२, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांच्या भूमिकेकडे लक्षऐरवी या ना त्या कारणाने नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरणाºया वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने वाळू माफियांना पोलिसांचा आशीर्वाद तर नाही ना अशी चर्चा वनविभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. सदर घटनेनंतर वडनेर येथील ठाणेदार वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वर्धा जिल्ह्यात वाळूमाफियांकडून वनरक्षकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:36 IST
वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश सज्जन यांच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही-सास्ताबाद पांदण रस्ता मार्गावर घडली.
वर्धा जिल्ह्यात वाळूमाफियांकडून वनरक्षकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देदुचाकीला धडक देत पाडले जमिनीवर आरोपीमध्ये सरपंचाचा समावेश