गॅस एजन्सीच्या अनागोंदीमुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण
By Admin | Updated: October 18, 2015 02:26 IST2015-10-18T02:26:58+5:302015-10-18T02:26:58+5:30
स्थानिक आर इण्डेन गॅस एजन्सीच्या सदोष व्यवस्थेमुळे देवळी व परिसरातील ग्राहक चांगलेच वैतागले आहेत.

गॅस एजन्सीच्या अनागोंदीमुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण
ग्राहकांची कोंडी : आठ ते दहा दिवस सिलिंडर मिळेना
देवळी : स्थानिक आर इण्डेन गॅस एजन्सीच्या सदोष व्यवस्थेमुळे देवळी व परिसरातील ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. आॅनलाईन बुकिंग केल्यानंतर सुद्धा आठ ते १० दिवसपर्यंत सिलिंडर मिळत नाही. एजन्सीच्यावतीने घरपोच सेवा पुरविली जात नसल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत गॅस एजन्सीच्या वरिष्ठांना तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
देवळी व परिसरात आर. इण्डेन हिच एकमेव गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांच्याकडे शेकडो ग्रहकांचा अधिभार आहे. गॅस सिलिंडरची गाडी वेळोवेळी येत नसल्यामुळे तसेच एजन्सीची यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एजन्सीसमोर दररोज ग्राहकांचा लोंढा बघावयास मिळतो. सणासुदीच्या दिवसात हा प्रकार नित्याचाच झाला आहे. ग्राहकांनी पावती फाडल्यानंतर ही पावती व गॅसपुस्तिका कार्यालयात देवून चार-पाच दिवसांनी ग्राहकांना बोलाविले जाते. या तारखेला ग्राहक गेल्यानंतर त्याला काही अडचणी सांगून पुन्हा तारखेला बोलाविले जाते. यादरम्यान एजन्सीकडे असलेली ग्राहकांची गॅसपुस्तिका व पावती गहाळ झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. गॅसच्या कार्यालयातून सिलिंडर न मिळता गोदामातून ते दिल्या जात आहे. ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांना वेळोवेळी कार्यालयात हेलपाटा मारणे शक्य नसल्यामुळे घरपोच सेवा देण्यात यावी. गॅसच्या स्टॉकची माहिती मोबाईल एसएमएसचे माध्यमातून देण्यात यावी.
यामध्ये गॅस एजन्सीची कुचराई खपवून न घेता आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा ईशारा ग्राहकांनी निवदेनातून दिला आहे. यावेळी राजू भुंबुर, प्रवीण फटींग, रामभाऊ तायडे, विकास राऊत, अविनाश पुसदकर, ज्ञानेश्वर पांडे, किरण देशमुख, मदन पाटील यांची उपस्थिही होती. (प्रतिनिधी)