एटीएम फोडून ४० लाख लांबविले
By Admin | Updated: November 5, 2015 02:20 IST2015-11-05T02:20:54+5:302015-11-05T02:20:54+5:30
दिवाळसणाची लगबग व यामुळे होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेता बँकांच्या एटीएममध्ये कॅश लोड केली जात आहे.

एटीएम फोडून ४० लाख लांबविले
गॅस कटरचा उपयोग : ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरटे सक्रिय
वर्धा : दिवाळसणाची लगबग व यामुळे होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेता बँकांच्या एटीएममध्ये कॅश लोड केली जात आहे. याचाच फायदा घेत वर्धा शहरात मंगळवारी रात्री गॅस कटरच्या साहाय्याने बोरगाव येथील बँक आॅफ इंडिया आणि प्रगती नगर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. यात जवळपास ४० लाखांची रोख चोरट्यांच्या टोळीने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. कुणाला संशय येऊन नये म्हणून एटीएमसमोर गाडी आडवी करून हा प्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीमुळे खरेदीची लगबग वाढली आहे. नागरिकांना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी बँकांद्वारे एटीएममध्ये नियमित कॅ श लोड केली जात आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांच्या एका टोळीने मंगळवारी रात्री एटीएम मशीन फोडून रोकड लंपास केली. या चोरट्यांनी सर्वप्रथम बोरगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम फोडले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्रगती कॉलनीकडे वळविला. येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधूनही रोकड पळविली. एटीएम हे शस्त्राच्या साहाय्याने तोडणे शक्य नसते. हे आधीच ओळखून चोरट्यांंनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा उपयोग केला. तसेच एटीएम फोडताना ते कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणूच चोरट्यांनी शक्कल लढवित एटीएमसमोर मोठे वाहन आडवे लावून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅश लोड केल्यापासून आतापर्यंत किती रक्कम ग्राहकांद्वारे काढण्यात आली हे अद्याप कळू शकले नसले तरी दोन्ही एटीएममधून ३० ते ४० लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.(शहर प्रतिनिधी)
एकाच रात्री दोन एटीएम फोडले
४दोन्ही एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातून रोकड लंपास करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही चोरी एकाच प्रकारच्या असल्याचे निदर्शनास येते. तसेच एक किंवा दोघांकडून ही चोरी करणे शक्य नाही. त्यामुळे यात मोठी टोळी सक्रीय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
४एटीएमच्या सुरक्षेसाठी येथे रात्री सुरक्षा कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दोन्ही ठिकाणी हा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा एकदा एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
काही नोटा जळाल्या
४चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा उपयोग केला आहे. त्यामुळे एटीएम फोडताना काही नोटा जळाल्याचे समजते.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
४घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे तसेच पथकाचा समावेश होता.