अट्टल घरफोड्या जाळ्यात
By Admin | Updated: February 19, 2017 01:44 IST2017-02-19T01:44:42+5:302017-02-19T01:44:42+5:30
घरफोडीच्या गुन्ह्यात साडेचार वर्षे कारावास भोगून परत आलेला आरोपी पुन्हा घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती आला आहे.

अट्टल घरफोड्या जाळ्यात
सात चोऱ्यांची कबुली : यापूर्वी चार वर्षे कारावास
हिंगणघाट : घरफोडीच्या गुन्ह्यात साडेचार वर्षे कारावास भोगून परत आलेला आरोपी पुन्हा घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती आला आहे. त्याने शहरात सात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई येथील गुन्हे पथकाच्या पोलिसांनी केली.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी येथील पोलीस पथक रात्र गस्तीवर असताना येथील बीसीसी मैदानावर एक इसम पळण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. पाठलाग करून त्याला सिंदी कॉलनीत गाठले. त्याने विक्की उर्फ दिलीप उर्फ सनी उमेश सराट असे नाव सांगितले. संशयावरुन त्याची कसून विचारपूस केली असता शहरातील सात घरफोड्यांची कबुली दिली. काही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने सुनील चव्हाण, मोहीत बाबुलाल बिनवने, राजेश सर्जेराव भोयर, सुनील मोहमल खियानी, प्रशांत ताराचंद बाराहाते, अब्दुल जुबेर अब्दुल कादर यांच्या घरातील चोरीची कबुली दिली.
पाच वर्षांपूर्वी केल्या होत्या १५ घरफोड्या
वर्धा : अट्टल घरफोड्या करणाऱ्या या आरोपीला पाच वर्षांपूर्वी त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. यावेळी त्याने १५ घरफोडीचे गुन्हे कबुल केले होते. यावेळी त्याला चार वर्ष शिक्षाही झाली होती. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणखी किती चोऱ्या उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर कारवाई ठाणेदार एस.डी. साळवे यांच्या मार्गदर्शनात दिलीप आंबटकर, गजेंद्र धर्मे, समीर कामडी, सतीश नंदागवळी यांच्या मार्गदर्शनात केली.