ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून चाकू हल्ला
By Admin | Updated: August 19, 2015 02:17 IST2015-08-19T02:17:15+5:302015-08-19T02:17:15+5:30
ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून सभाध्यक्षासह त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना म्हसाळा येथे शनिवारी घडली.

ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून चाकू हल्ला
युवक जखमी : म्हसाळा येथील प्रकार
वर्धा : ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून सभाध्यक्षासह त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना म्हसाळा येथे शनिवारी घडली. यात राजेंद्र जुनघरे रा. गाडगेनगर, म्हसाळा नामक युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनी म्हसाळा ग्रामपंचायतीची सभा सुरू होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुन्ना यादव होते. सभेत राजेंद्र याने प्रश्न विचारले असता त्याला उत्तर न देता अध्यक्षाने त्याला तुला पाहुन घेतो अशी धमकी दिली. सभा संपल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास राजेंद्र त्याच्या घराकडे जात असताना यादव व त्याचे सहकारी सतीश नानोटकर व रामा आडे यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यात राजेंद्र जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजेंद्रचा भाऊ संदीप देवराव जुनघरे याच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर भादंविच्या कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)