आष्टी तालुका विकास आराखडा तयार
By Admin | Updated: July 1, 2015 02:42 IST2015-07-01T02:42:22+5:302015-07-01T02:42:22+5:30
शासनाच्या योजना ग्रामीण भागाचा विकास साधणाऱ्या आहेत. यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

आष्टी तालुका विकास आराखडा तयार
आष्टी (श.) : शासनाच्या योजना ग्रामीण भागाचा विकास साधणाऱ्या आहेत. यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. वर्षभरापासून यासाठी शासनदरबारी समस्यांचा पाठपुरावा सुरू आहे. याला यश आल्याचे सांगून आमदार अमर काळे यांनी आष्टी तालुक्याचा विकास आराखडा सादर केला. तालुका आढावा सभा येथे पार पडली. यावेळी आ. काळे यांनी विकास कामांसह समस्यांचा आढावा घेतला.
बैठकीला नियोजन विकास समितीचे सदस्य अरुण बाजारे, जि.प. सदस्य निर्मला बिजवे, पं.स. सदस्य डॉ. प्रदीप राणे, मुजाहीद खॉ, काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र गंजीवाले, साहेब खाँ पठाण, राजेंद्र भातकुलकर आदी उपस्थित होते. येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी शासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले. इमारत बांधकामाचे टेंडर लवकरच प्रकाशित होईल व बांधकामही सुरू होईल. तळेगाव पोलीस ठाणे इमारत बांधकामासाठी एक कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याच्याही निविदा प्रक्रिया त्वरित होईल. तालुकास्थानी आवश्यक न्यायालय सद्यस्थितीत किरायाच्या इमारतीत आहे. शासनाकडे न्यायालयाच्या इमारतीसाठी मागणी केली. ती अंतिम टप्प्यात असून मंजुरीची प्रतीक्षा आहे, असेही आ. काळे यांनी सांगितले. आष्टी व पेठअहमदपूर गावाला जोडणाऱ्या लेंडी नदीवरील पुलाचे बांधकाम, गौरखेडा वॉर्डातील पुरहानी करणाऱ्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, गोदावरी अॅप्रोज रोड, टेकोडा अॅप्रोज रोड बांधकाम जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित केले आहे. मंजुरी मिळताच विकास कामे सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार निधी अंतर्गत आवश्यक ठिकाणी रस्ते, पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा, सभागृह बांधकाम प्रस्तावित आहे. निधी अपुरा असल्याने कामे पूर्ण करण्यात अडथळा येत आहे. पॅकेज अंतर्गत तालुक्यात मंजूर सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले; पण वीज कंपनीने जोडणी दिली नाही. यामुळे शेतकरी पाणी असताना रबी व उन्हाळी पिके घेऊ शकत नाही. वीज कंपनीने त्वरित विद्युत जोडणी देण्याची मागणी वरिष्ठांकडे लावून धरणार आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनेक दिवसांपासून मानधनाची प्रतीक्षा असून ती समस्या सोडविली जाणार आहे. यासाठी तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्याचेही बैठकीत आ. काळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)