आष्टी-साहूर राज्यमार्ग खड्डेमय
By Admin | Updated: October 2, 2016 00:55 IST2016-10-02T00:55:56+5:302016-10-02T00:55:56+5:30
गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे.

आष्टी-साहूर राज्यमार्ग खड्डेमय
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : तीन दिवसांत बारा अपघात
आष्टी (श.) : गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. आष्टी-साहूर राज्य मार्गावर पांढुर्णा फाट्याजवळ ४ बाय ९ मिटर रोडला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचले. या खड्ड्यामुळे तीन दिवसांत दुचाकीचे १२ अपघात झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन भोरे यांनी निवेदन देत त्वरित खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे.
आष्टी-साहूर मार्ग खड्डेमय झाला आहे. साईडपट्ट्या दोन्ही बाजुने डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. या खड्ड्यात ३ फुट खोल पाणी साचल्याने दुचाकी, ट्रक, कार चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाने वरूड, मुलताई, बैतुलकडे शेकडो ट्रक धावतात. दुचाकी दिवसभर सुरू असतात. बारा अपघातात सर्व दुचाकी चालक व सहकारी गंभीर जखमी झाले. सदर रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही गजानन भोरे यांनी निवेदनातून दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)
साडेचार कोटींचा खर्च व्यर्थ
आष्टी-साहूर राज्यमार्गाच्या डांबरीकरणावर दोन वर्षांपूर्वी तीन कोटी तर मागील वर्षी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्यावर दिवसरात्र रहदारी सुरू असते. जड वाहतुकीमुळे रस्त्याच्या कामावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बांधकामाचा दर्जा सूमार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते. डांबरामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ राहत असल्याने वर्षभरामध्ये रस्ता उखडण्याची हमी दिली जात असल्याचेच दिसते. शासनाच्या निधीला चुना लावण्याचे काम सुरू आहे. काम झाल्यानंतर वर्षाअखेरीस रस्ता का उखडतो, यावर विचार करण्याची वेळ आली असताना त्याकडेही कानाडोळाच केला जात असल्याचे दिसते. चांगल्या रस्त्यांसाठी शासन निधी देते; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा भ्रष्ट ठरत आहे. यामुळेच रस्त्याची वाट लागत आहे.
साईडपट्ट्या धोकादायक
तळेगाव ते आष्टी, आष्टी ते साहूर या दोन्ही मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत जाते. यामुळे पट्ट्यांचा उतार कसा काढायचा, याचेही नियोजन गरजेचे आहे. अपघाताचे प्रमाण यामुळेच वाढत आहे. एकावेळी दोन वाहने आल्यास दुचाकी चालकाला जाण्यासाठी जागाच राहत नाही. यामुळे अपघात होत आहे. नागरिकांची ओरड बांधकाम विभागाला नित्याचीच झाली असून तेही दुर्लक्षच करतात.
आले अधिकारी ठेकेदाराच्या मना
रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्यावर अधिकारी डांबरी हॉटमिक्स प्लॅन्टवर जात नाही. एकत्र झालेले साहित्य रस्त्यावर टाकले जाते. यामुळे बारा महिन्यात त्याचे बारा वाजतात. अधिकारी उपस्थित राहत नाही. नागरिक ओरडून सांगतात; पण अधिकारी मनावर घेईल तरच ना! रस्त्यांची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाला जागा येते. हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. शासनाच्या निधीचा योग्यरित्या खर्च करून भ्रष्टाचारमुक्त कामे करावी, अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत. रस्त्यांची होणारी चाळणी आतातरी थांबवावी, अशी मागणी आष्टी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.