आर्वीतही ‘नो व्हेईकल डे’
By Admin | Updated: January 6, 2016 02:46 IST2016-01-06T02:46:18+5:302016-01-06T02:46:18+5:30
पर्यावरण बचावासोबतच प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’चा जागर सुरू केला. वर्धा शहरातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोन जिल्हाभर पसरत आहे.

आर्वीतही ‘नो व्हेईकल डे’
बैठक : इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा पुढाकार
आर्वी : पर्यावरण बचावासोबतच प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’चा जागर सुरू केला. वर्धा शहरातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोन जिल्हाभर पसरत आहे. पहिले देवळी आता आर्वीतही ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याबाबत बैठक झाली आहे. येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटीने यासाठी पुढाकर घेतला आहे. या संदर्भात डॉ. अरुण पावडे यांच्या पुढाकाराने बैठक झाली आहे.
हा सामाजिक उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यासाठी आर्वीतीत शाळा, महाविद्यालये सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांचा यात उत्स्फूर्त सहभाग राहावा, यासाठी शुक्रवारी आर्वीत दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य विविध सामाजिक संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच उपाविभागीय अधिकारी, निमशासकीय कर्मचारी यांना या सभेसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती इंडियन रेडक्रॉस सोसायटीने दिली.
या सभेला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, कृषी अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक व इतर सामाजिक संघटना, आर्वी तालुका समिती व इतर सामाजिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या संघटना या उपक्रमात सहभागी होणार आहे.
शुक्रवारी होणार असलेल्या सभेत ‘नो व्हेईकल डे’ची तारीख व दिवस निश्चित करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अरूण पावडे यांनी केले आहे. वर्धेत व देवळीत आठवड्याच्या गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यास सुरुवात झाली असून आर्वीतही गुरुवारचीच चर्चा सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)