आर्वीत पाळला ‘नो व्हेईकल डे’
By Admin | Updated: February 27, 2016 02:32 IST2016-02-27T02:32:28+5:302016-02-27T02:32:28+5:30
स्थानिक संजिवनी मंच व शालेय विद्यार्थिनीनी ‘नो व्हेईकल डे’ कृती समिती तसेच विविध सामाजिक संघटनांच्या महिला..

आर्वीत पाळला ‘नो व्हेईकल डे’
उपक्रम : संजीवनी मंच, शिवशक्ती गणेश मंडळाचा पुढाकार
आर्वी : स्थानिक संजिवनी मंच व शालेय विद्यार्थिनीनी ‘नो व्हेईकल डे’ कृती समिती तसेच विविध सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी व शिवशक्ती गणेश मंडळाच्या सहकार्याने आर्वीत २६ फेब्रुवारीला शुक्रवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळला.
यामध्ये आर्वीतील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, प्राध्यापक वृंद, शिक्षक, नगरसेवक, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी सत्संग मंडळ, राधास्वामी सत्संग आदी मंडळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा शुभारंभ सकाळी ९ वाजता स्थानिक पावडे हॉस्पिटल येथून अॅड. शोभाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आला. ही रॅली शिवाजी चौक, गांधी चौक, बालाजी वॉर्ड, गौरक्षण वॉर्ड, पंचायत समिती परिसर, पद्मावती चौक ते स्टेशन वॉर्ड या मार्गावरून नेण्यात आली. या रॅलीचा समारोप स्टेशन वॉर्ड येथे करण्यात आला.
समारोप प्रसंगी पालिकेच्या नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित यांनी या उपाक्रमाची भूमिका विषद करून आर्वीत सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमात सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी संजीवनी मंचच्या अध्यक्षा पद्मा लाखे, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. विनय देशपांडे यांनी यावेळी मार्गदर्शन करून ‘नो व्हेईकल डे’ चे महत्व उपस्थितांना पटवून दिले.
या रॅलीत स्थानिक संजिवनी मंचच्या महिला, कला, वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद, कृषक कन्या शाळा येथील विद्यार्थिनी व शिक्षिका, राधास्वामी सत्संग, निरंकारी सत्संग मंडळाच्या महिला, आर्वी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, आय.एम.ए., लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी, ‘नो व्हेईकल डे’ कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरूण पावडे, भारत व कृषक संस्थेचे प्राध्यापक व शिक्षक, आर्वी पालिकेचे नगरसेवक, शिवशक्ती गणेश मंडळ स्टेशन वॉर्ड येथील मंडळाचे पदाधिकारी आदींनी या रॅलीत सहभाग घेतला. रॅलीचा समारोप स्टेशन वॉर्ड येथे करण्यात आला. संचालन व आभार प्रा. अभय दर्भे यांनी केले. आर्वीत दर शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांचा ‘नो व्हेईकल डे’ ला पाठींबा मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)