आर्वीत कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:24+5:30

आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या दरम्यान एकूण १७ कोरोना रुग्ण आढळले.

Arvit corona explosion | आर्वीत कोरोनाचा विस्फोट

आर्वीत कोरोनाचा विस्फोट

Next
ठळक मुद्दे१७ कोरोना रुग्णांची नोंद : कोविड विषाणूने एका महिलेचा घेतला बळी

राजेश सोळंकी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात चोरपावलांनी शिरकाव केलेल्या कोरोनाने आता हळूहळू शहरी भागातही पाय पसरायला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.
आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या दरम्यान एकूण १७ कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. १० मे रोजी जिल्ह्यातील सर्वात पहिला रुग्ण आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावात आढळला. हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल सात आणि तीन असा एकूण दहा किमीचा परिसर कंटेन्मेंट आणि बफर झोन तयार करून सील करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच जामखुटा या गावातील तीन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे १७ मे रोजी पुढे आले. त्यानंतर २२ मे रोजी आर्वी तालुक्यातील रोहणा नजीकचे नागापूर येथे बाहेरून आलेला इसम कोरोनाबाधित आढळला. २५ मे रोजी आर्वी शहरातील पुरुषोमल चौक सिंदी कॅम्प येथे कोरोना बाधित महिला आढळल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली. सदर महिला ही अकोला येथील आर्वीत दाखल झाली होती. तर वर्धमनेरी येथील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ५ जून रोजी पुढे आले. त्यानंतर तब्बल २२ दिवसानंतर २७ जून रोजी आर्वी शहरातील जाजुवाडीत नवीन कोरोना बाधित आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ५ जुलैला आर्वीचे नगराध्यक्षच कोरोना बाधित निघाल्याने वल्लीसाहेब वॉर्ड सील करण्यात आला.
७ जुलैला श्रीराम वार्डातील वयोवृद्ध व्यक्ती, ११ जुलैला नेताजी वार्डातील ४२ वर्षीय व्यक्ती तसेच आर्वी तालुक्यातील नटाला बोथली येथील २२ वर्षीय युवती आणि १२ जुलैला रामदेव बाबा वार्डातील २३ वर्षीय युवक तसेच सोमवारी भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाबाबतची दहशत निर्माण झाली आहे. मध्यतंरीच्या काळात आर्वीच्या प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बाहेरून येताना १४ दिवस विलगीकरणाबाबतही आदेश पारीत केलेत.

दोन महिन्यांत ८,२३६ व्यक्ती गृहविलगीकरणात
आर्वी तालुक्यातील एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला. तालुक्यात मागील दोन महिन्यांच्या काळात ८ हजार २३६ व्यक्तींना होम क्वारंटाईन केले. त्यापैकी ७ हजार २११ व्यक्तींच्या गृहविलगीकरणाचा कालावधी संपला आहे. सध्या हायरिस्कमध्ये ११ तर लो-रिस्क मध्ये २४ व्यक्ती असून त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या २४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.

निकट संपर्कातील सर्वच निगेटिव्ह
कोरोना बाधिताची नोंद घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. पण कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.

आठ परिसर झाले सील
कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून क्लस्टर कंटेन्मेंट कृती आराखडा अंमलात आणून आर्वी शहरातील पुरुषोमल चौक सिंधी कॅम्प, जाजुवाडी परिसर, वल्ली साहेब वार्ड, श्रीराम वार्ड, नेताजी वार्ड, रामदेव बाबा वार्ड, शासकीय कर्मचारी निवासस्थान (नेताजी चौक )सील केले होते.

तीन वेळा संचारबंदी
आर्वीत मागील दोन महिन्यांच्या काळात एकूण तीन वेळा सक्तीची संचारबंदी लागू करून नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या जनता कर्फ्यूला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे.

नागरिकांनी स्वत:ला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी हात धुवावे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- हरिष धार्मिक, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.

Web Title: Arvit corona explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.