आर्वीत भाजपला, तर सेलूत काँग्रेसच्या प्रचाराला लागले डबल इंजिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:14 IST2019-04-01T23:14:06+5:302019-04-01T23:14:19+5:30
वर्धा लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता प्रचाराचा वेग वाढत आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार सुधीर दिवे हेही सांभाळत आहे. याठिकाणी भाजपचे दोन नेते प्रचाराची धुरा सांभाळत असल्याने यावेळी येथे भाजपला मताधिक्याची मोठी आशा आहे. सेलू येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला दोघांची जोड मिळाली आहे.

आर्वीत भाजपला, तर सेलूत काँग्रेसच्या प्रचाराला लागले डबल इंजिन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता प्रचाराचा वेग वाढत आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार सुधीर दिवे हेही सांभाळत आहे. याठिकाणी भाजपचे दोन नेते प्रचाराची धुरा सांभाळत असल्याने यावेळी येथे भाजपला मताधिक्याची मोठी आशा आहे. सेलू येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला दोघांची जोड मिळाली आहे.
काँग्रेसचे नेते दिवंगत प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे व वर्धा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय उर्फ पप्पू जयस्वाल हे कॉँग्रेस उमेदवार यांच्या प्रचारार्थ काम सांभाळत आहे. या भागावर पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे यांची एक हाती पकड होती. परंतु, त्यानंतरच्या काळात माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी या भागातील शेडेंच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम केले. सोबतच सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवणाऱ्या माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्याही कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्याच नेतृत्वाला शह देण्याचे काम केले. त्यामुळे जयस्वाल यांच्याकडे कॉँग्रेसची जबाबदारी आली. आता कॉँग्रेस उमेदवाराला जयस्वाल व शेंडे या दोघांचाही आधार घ्यावा लागत आहे.
हिंगणघाट मतदार संघात समाविष्ट असलेल्या भागात जयस्वाल यांना प्रचारासाठी कॉँग्रेस उमेदवार सोबत घेवून गेले तर काही भागात शेखर शेंडे सोबत होते, अशी चर्चा आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा पराभव झाला.
आता या मतदारसंघात सुधीर दिवे व दादाराव केचे दोघेही भाजपच्या प्रचारासाठी जोरदार लागले आहे. याचा फायदा लोकसभा उमेदवाराला किती होतो, हे पाहणे महत्वाचे राहिल. काँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या विषयी असलेली ‘अॅन्टी इन कंबन्सी’ याचाही फायदा भाजपला होईल शिवाय बसपाचे उमेदवार शैलेश अग्रवाल हे या भागातून कॉँग्रेसच्या किती मताना कात्री लावतात हेही महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे आर्वी हा गड राखून ठेवण्यासाठी आ. अमर काळेंसह त्यांच्या समर्थकांना प्रचारात मेहनत करावी लागणार आहे.