आर्वी आगाराच्या बसगाड्या रिमोल्ड टायरवरच
By Admin | Updated: August 3, 2016 01:04 IST2016-08-03T01:04:32+5:302016-08-03T01:04:32+5:30
सातत्याने मागणी करूनही गत १५ दिवसांपासून विभागीय कार्यालयातून आर्वी आगाराला नवीन टायर प्राप्त झाले नाही.

आर्वी आगाराच्या बसगाड्या रिमोल्ड टायरवरच
१५ दिवसांपासून टायरचा पुरवठा नाही : गाड्या रस्त्यात कुठेही पडतात बंद
आर्वी : सातत्याने मागणी करूनही गत १५ दिवसांपासून विभागीय कार्यालयातून आर्वी आगाराला नवीन टायर प्राप्त झाले नाही. यामुळे येथील बसगाड्या रिमोल्ड टायरवरच धावत आहेत. परिणामी या नवीन संकटाने चालक व वाहकही त्रस्त झाले आहेत. या बसेच रस्त्यात कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांच्या जिविताशीच परिवहन विभागाचा सध्या खेळ सुरू आहे.
आर्वी उपविभागाचे ठिकाण आहे. येथील परिवहन विभागाकडून करण्यात येत असलेल्या मागणीनुसार नेहमीच कमी टायर मिळाले आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे वर्षातून दोन वेळी टायर बदलविणे अपेक्षित आहे. येथे एक वर्षाच्यावर काळ होऊनही टायर मिळाले नाही. गाड्यांच्या टायरचे आयुष्य संपुनही त्यावरच गाड्या धावत आहे. परिणामी यात वेळेवर गाड्यांचे शेड्युल रद्द होते. चालक-वाहक या रोजच्या टायर अभावी बंद पडणाऱ्या गाड्याने त्रस्त झाले आहेत. आर्वी बसस्थानक प्रमुखाने विभागीय कार्यालयाला टायर पुरवठ्याची तातडीने मागणी करूनही अद्याप पुरवठा केला नसल्याने चालक वाहकासमोर नव्या समस्या निर्माण होत आहे. सध्या आर्वी परिवहन विभागाच्या सर्व गाड्या रिमोल्ड टायरवर धावत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
यात एका गावाला जाणाऱ्या पाच ते सहा शेड्युल नियमित जात असेल तर ते अर्ध्यावर आल्याने प्रवाशांची बसअभावी ताटकळत होत आहे. यावर तातडीने उपाय काढून परिवहन मंडळाने प्रवाशांच्या जीवितांशी सुरू असलेला खेळ तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे. सध्या टायर अभावी भंगार अवस्थेत गाड्या परिवहन विभागात उभ्या असून याचा फटका परिवहन महामंडळाला बसत असल्याची ओरड होत आहे.(तालुका प्रतिनिधी)