स्पर्धेतून कलागुणांना चालना मिळते
By Admin | Updated: December 12, 2015 04:48 IST2015-12-12T04:48:22+5:302015-12-12T04:48:22+5:30
अपंग व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असून अपंगांना सहानुभूती नाही तर सहकार्याची गरज आहे. याकरिता

स्पर्धेतून कलागुणांना चालना मिळते
प्रमोद पवार : अपंग विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा महोत्सवातून दिला अंगभूत गुणांचा परिचय
वर्धा : अपंग व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असून अपंगांना सहानुभूती नाही तर सहकार्याची गरज आहे. याकरिता प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेवून अपंगाना सहकार्य करावे. तसेच कला व क्रीडा स्पर्धेतून त्यांच्यातील कलागुणांना चालना मिळते, असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांनी व्यक्त केले.
समाज कल्याण विभाग व अपंगाच्या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा तालुक्याकरिता अपंगांचा कला व क्रीडा महोत्सव घेण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
या महोत्सवात मतिमंद, मूकबधिर, अस्थिव्यंग, अंध या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपल्या शारीरिक क्षमता प्रदर्शित केल्या. स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण सभापती वसंत पाचोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन ५० मिटर दौड स्पर्धेने करण्यात आले. यावेळी सभापती पाचोडे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात केली. यानंतर दिवसभर सुरू असलेल्या स्पर्धा क्रीडा स्पर्धा समिती प्रमुख नरेंद्रकुमार कांबळे, श्याम भेंडे यांच्या निदर्शनाखाली घेण्यात आल्या.
यात लांबउडी, गोळाफेक, ५० मि, १०० मि व ४०० मि. दौडस्पर्धा, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून खेळाडूंनी कलागुणांची चुणूक दाखविली. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून राहुल खैरकार, विनय नागतोडे, धनंजय देशमुख, अनिकेत तळवेकर, विजय बिसने यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन श्याम भेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रदिप शिरे यांनी मानले. कार्यक्रमाला कृष्णकुमार काकपुरे, विलास आष्टेकर, प्रशांत दौलतकर, संगीता देशमुख, ज्योती लोखंडे, शरद शामतकर यासह अपंग शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
भानुदास महाराज मूकबधिर विद्या मंदिर अव्वल
४आर्वी- तालुक्यातील वर्धमनेरी येथील संत भानुदास महाराज संस्था अंतर्गत मूकबधिर विद्या मंदिर तसेच अंध विद्यालय, वर्धमनेरी येथील विद्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करुन स्पर्धेत अव्वल येण्याचा बहुमान मिळविला. अपंगाकरिता घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत येथील चमुने यश मिळविले आहे. चित्रकला स्पर्धेत मूक बधीर विद्या मंदिरची विद्यार्थिनी ममता पाटील ही प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. तर द्वितीय पुरस्कार याच शाळेच्या उज्वल मून याने मिळविला.
४नृत्य स्पर्धेत अंध विद्यालयातील पौर्णिमा बोडखे, साक्षी माहुलकर, कुणाल निंभोरकर, विशाल सरदार, प्रदीप दीपके या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक नृत्याला द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रदीप शीरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
४क्रीडा स्पर्धेत ममता पाटील हिने लांब उडी, आकाश गुरुभेले याने ४०० मी. दौड, हर्षा धुडे हिने ४०० मी. दौड, शुभम नासणे याने गोळाफेक, नंदा गायकवाड हिने गोळाफेक, संकल्प नागपुरे हिने गोळाफेक, आकाश गुरुभेले याने २०० मी. दौड, सीमा तेलगोटे हिने लांबउडी व २०० मी. दौड, नंदा गायकवाड हिने ४०० मी. दौड, नितेश डायरे याने ४०० मी. दौड हे पुरस्काराचे मानकरी ठरले. तसेच अंध विद्यालय, वर्धमनेरी येथील अजय इटकर याने गोळाफेक, व ५० मी. दौड, प्रियंका घोडाम हिने गोळाफेक, व १०० मी. दौड, विशाल घोडाम याने गोळाफेक, कुणाल निंबोरकर याने २५ मि. दौड, शुभम सोनकुसरे याने २५ मी. दौड, पौर्णिमा बोडखे हिने पासिंग द बॉल या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळविले आहे. तर मयुरी कोहळे हिने ५० मी. धावणे, उभेराहून लांबउडी, कुणाल निंबोरकर याने पासिंग द बॉल, आशिष इरपाचे याने ५० मी. दौड, उभेराहुन लांबउडी, प्रदीप दीपके याने १०० मी. दौड, पोर्णिमा बोडखे हिने २५ मी. दौड, वैष्णवी पापडकर हिने बुद्धीबळ तर यश सुपनर याने बुद्धीबळ, साक्षी माहुलकर हिने २०० मी. दौड या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविले. विद्यार्थ्यांना बी.एन.गिरडकर, डी.एफ निमकर, प्रकाश गोठाणे यांनी मार्गदर्शन केले.(तालुका प्रतिनिधी)