शहरातील बाजारपेठेत साखरगाठ्यांचे आगमन
By Admin | Updated: March 4, 2015 02:11 IST2015-03-04T02:11:47+5:302015-03-04T02:11:47+5:30
शिशिर ऋतुचा उत्तरार्ध होतो तो होलिकात्सवाने. यानंतर चाहुल लागते

शहरातील बाजारपेठेत साखरगाठ्यांचे आगमन
होळीच्या सणाची चाहुल : गाठ्यांवरही महागाईचे सावट; ८० रुपये किलोचा दर
वर्धा : शिशिर ऋतुचा उत्तरार्ध होतो तो होलिकात्सवाने. यानंतर चाहुल लागते वसंतागमनाची. निसर्गही या काळात आपले रूप पालटतो. होळी हा जसा रंगांचा सण मानला जातो तसाच गोधधोड पदार्थांचीही याकाळात रेलचेल असते. या सणाला घरातील लहानग्यांना गाठी देण्याची परंपरा आजतागत कायम आहे. शहरातील बाजारपेठेतही साखरगाठ्यांनी दुकाने सजलेली पहायला मिळत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखरगाठ्यांच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येते. गत वर्षी गाठ्यांचा दर ८० ते १५० रुपयांपर्यंत होते. यंदा मात्र तेच दर ६० ते ८० रुपयांपर्यंत आहे. यामुळे महागाईच्या धबडग्यात सर्वसामान्यांना ही बाब दिलासा देणारी ठरणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होळी व धुलिवंदन आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठतेही आवश्यक वस्तुंची आवक सुरू झाली आहे. शुभ्र रंगासह विविध रंगातील गाठ्या दुकानांमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहे. शिवाय पिचकारी, गुलाल यांनी तर बाजारपेठही खुलून गेली आहेत.
ग्रामीण भागातूनही लोक शहारात गाठ्या खरेदी करण्याकरिता येत आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठेत होळी व धूलिवंदनानिमित्त गाठीची ठिकठिकाणी दुकाने थाटलेली दिसतात. यातच भाव कमी असल्याने यंदा गाठ्यांची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी होईल, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. सध्या गाठ्यांच्या दुकानात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
विविध आकारातील व रंगातील गाठ्या ठरताहेत ग्राहकांचे आकर्षण
होळी सणाच्या आठ दिवसांपूर्वी पासूनच बाजारात गाठीचे दुकाने सजली आहेत. विशेष म्हणजे साधारण गाठ्यांसह वेगवेगळया आकारातील गाठ्या ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात.
बाजारात सध्या लहान आकारातील तसेच मोठे पदक असलेल्या गाठ्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. यातील साधारण व लहान ठपक्यांच्या गाठ्या ८० रुपये प्रति किलो दराने तर मोठ्या पदकांच्या गाठ्या १२० व ७० रुपये दराने विकल्या जात आहेत.
गाठ्यांचे नवे रूप
गाठ्या ग्राहकांच्या पसंतीस याव्यात यासाठी दरवर्षी त्यांच्या आकारात बदल केले जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साध्या रूपात रंगीबिरंगी व विविध कलाकृती केलेल्या गाठ्यांची गर्दी बाजारात दिसून येत आहे.