रुपेशच्या मारेकऱ्यांना अटक करा

By Admin | Updated: November 13, 2014 23:05 IST2014-11-13T23:05:37+5:302014-11-13T23:05:37+5:30

हत्या करून किडणी व डोळे चोरी करण्याचा एवढा मोठा प्रकार होऊनही कलेक्टर व एसपीसारख्या अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध असो, चौकशीत दिरंगाई करणाऱ्या

Arrest Rupesh's killers | रुपेशच्या मारेकऱ्यांना अटक करा

रुपेशच्या मारेकऱ्यांना अटक करा

निषेध मोर्चा : लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडेही वेधले लक्ष
वर्धा : हत्या करून किडणी व डोळे चोरी करण्याचा एवढा मोठा प्रकार होऊनही कलेक्टर व एसपीसारख्या अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध असो, चौकशीत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांचा निषेध असो, रूपेश मुळे याच्या क्रूर हत्येचा निषेध असो, घोषणा देत गुरुवारी शहरातून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून रूपेशला न्याय द्या, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
घटना उघडकीस आल्यापासून पाच दिवसांचा कालावधी लोटला तरीही पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली नाही. आरोपीला अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी मोर्चेकरी करीत होते. या मोर्चामध्ये वडार समाज बांधव लहानमुलांसह सहभागी झाले होते. शहरातील विविध सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्षांचे नेतेमंडळी देखील सहभागी झाले होते.
स्थानिक आर्वी नाका चौकातून ११.३० वाजताच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. शिवाजी चौक, बजाज चौक मार्गे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचला. त्यानंतर एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून रूपेश मुळे मृत्यू प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणीही करण्यात आली. जिल्ह्यात लहान मुलांवरील अत्याचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही भीती कायमची दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, याकडेही जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मोर्चेकरांनी पोलीस प्रशासन दिरंगाई आणि चुकीच्या पद्धतीने गंभीर प्रकरणे हाताळत असल्याबाबतही आपला रोष व्यक्त केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी आरोपी लवकर अटक करु, असे ठोस आश्वासन दिले. यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला. शिष्टमंडळात प्रा़ शिवाजी इथापे, मनोहर पंचारिया, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे व अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, नुतन माळवी, सुधीर पांगुळ, शारदा झामरे, तुषार देवढे, प्रशांत कुत्तरमारे, अविनाश काकडे, गजेंद्र सुरकार, बॉबी जगदळे, विजय आगलावे, मुन्ना झाडे, विल्सन मोखाडे, इम्रान कैसर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Arrest Rupesh's killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.