लागवड क्षेत्र वाढताच सोयाबीनचे उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:20 IST2020-10-07T18:16:42+5:302020-10-07T18:20:06+5:30
Soyabean, Wardha News सततचा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

लागवड क्षेत्र वाढताच सोयाबीनचे उत्पादन घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्या हंगामात कापूस उत्पादकांना कापूस विक्रीकरिता चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवित सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली. मात्र, सततचा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वर्धा जिल्ह्यासह राज्यभरातील इतरही जिल्ह्यातील हीच परिस्थिती असून अद्यापही सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाही, ही वास्तविकता आहे.
कापूस उत्पादकांना मागील वर्षीचा कापूस यावर्षीच्या हंगामापर्यंत घरात साठवून ठेवावा लागला. त्यातच कोरोनाचा प्रकोप वाढल्यो मिळेत त्या भावात विकावा लागला. यावर्षी वर्धा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. विशेषत: यावर्षी ३० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड वाढविण्यात आली. पण, सततचा पाऊस, बोगस बियाण्यांची विक्री आणि येलो मोझॅक, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी व खोडमाशी या रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले. ही परिस्थिती सर्वत्र असून सध्या एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीन ऐवजी तीन ते चार पोते सोयाबीनचा उतारा मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्मे झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.
बोनस पिकच हातून गेले
दरवर्षी सोयाबीनच्या माध्यमातून दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्यांना बोनस उत्पन्न मिळत असते. परंतु यावर्षी सोयाबीन वाढले पण, शेंगाचा पत्ता नाही. तसेच उत्पादनही निम्म्यावर आल्याने खर्चही भागणार नसल्याने शेतकºयांचे बोनसच गेल्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
कृषी विभाग बांधापासून लांबच
सततच्या पावसाने पिकांवर मोठा आघात केला आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचा पंचनामा करुन शासकीय मदत मिळण्याची मागणी होत आहे. मात्र, कृषी विभाग अद्यापही पंचनाम्याकरिता बांधावर पोहोचलाच नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे पंचनामेच झाले नाही तर नुकसान भरपाई मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.