तोडफोडीच्या निषेघार्थ आर्वीत मूकमोर्चा
By Admin | Updated: July 13, 2016 02:45 IST2016-07-13T02:45:53+5:302016-07-13T02:45:53+5:30
येथील डॉ. पावडे यांच्या नर्सिंग होमसह त्यांच्या घरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला.

तोडफोडीच्या निषेघार्थ आर्वीत मूकमोर्चा
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : शिवसेना जिल्हा प्रमुखावर कारवाईची मागणी
आर्वी : येथील डॉ. पावडे यांच्या नर्सिंग होमसह त्यांच्या घरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. यात दरवाजे, खिडक्या व बेंचेसची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी या घटनेच्या निषेधार्थ शहरातील डॉक्टर, इंडियन रेडक्रास, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादीचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक संघटना, प्राध्यापकांनी काळ्या फित लावून शहरातील प्रमुख मार्गाने मूक मोर्चा काढला. दिवसभर येथील बाजारपेठही बंद होती.
मोर्चाच्या माध्यमातून आयएमएने प्रभारी उपविभागीय अधिकारी चव्हाण यांना निवेदन सादर करुन तोडफोड व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना त्वरीत अटक करावी, अशा मागणीही केली. या घटनेने आर्वीतील वातावरण ढवळून निघाले आहे.
अटक न झाल्यास दवाखाने व औषधी दुकाने बंद ठेवणार
आर्वी : सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दोन मुलांची आई असलेली महिला अपत्य नको म्हणून डॉ. पावडे नर्सिंग होममध्ये दाखल झाली. नर्सिंग होम शासनमान्य गर्भपात केंद्र असल्याने गर्भपात करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या औषद्योपचार केला असता अचानक दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तिची प्रकृती बिघडली. डॉ. पावडे यांच्या रुग्णालयातील व बाहेरील तज्ज्ञ डॉक्टराची मदत घेऊन महिलेवर उपचार करण्यात आला. मात्र यात तिचा मृत्यू झाला. महिला मृत पावल्यावर नातेवाईकांना त्याची माहिती देण्यात येऊन मृतक महिलेचे शवविच्छेदन करण्यात यावे, असा आग्रह डॉ. पावडे यांनी धरुन प्रकरणाची माहिती आर्वी पोलिसांना दिली. मृतक महिलेच्या नातेवाईकांची इच्छा नसताना मृत्यूचे कारण समजावे, असा प्रयत्न दवाखान्याचा होता. डॉ. पावडे नर्सिंग होममध्ये पोलिसांनी संपूर्ण कार्यवाही करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविला. असे असताना वर्धा जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश देशमुख यांनी डॉ. पावडे नर्सिंग होम समोरील बेंचेसची तोडफोड करून डॉ. पावडे यांच्या राहत्या घराच्या खिडक्या व दरवाज्याची तोडफोड करून तणाव निर्माण केला, असा आरोप यावेळी आयएमएतर्फे करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली नाही, तर बुधवारी जिल्ह्यातील सर्व दवाखाने व मेडिकल स्टोर्स बंद राहतील. हे आंदोलन महाराष्ट्रात पोहचेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला आय.एम.ए.चे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. पुनसे, जिल्हाध्यक्ष अनुप हिवलेकर, डॉ. विनोद अदलखिया, डॉ. प्रदीप खुने, डॉ. नितीन भलमे, डॉ. महाजन, डॉ. घाटे, डॉ. मोगरे, डॉ. लोटे, डॉ. सतीश राणे, डॉ. सचिन डायगव्हाणे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. सचिन पावडे, इत्यादी वर्धा येथील नामवंत डॉक्टर मंडळी तसेच आर्वी शहरातील डॉ. रिपल राणे, डॉ. अरुण पावडे, डॉ. अजमिरे, डॉ. विनय देशपांडे, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. भुतडा, डॉ. राजेंद्र जाजू, डॉ. डेहनकर, डॉ. मोटवानी, डॉ. जाने, डॉ. चोरे, इत्यादी डॉक्टर मंडळी तसेच आयएमए.,निमा, डॉक्टर असोसिऐशन, केमिस्ट संघटना व इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)