एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा
By Admin | Updated: April 12, 2016 04:25 IST2016-04-12T04:25:29+5:302016-04-12T04:25:29+5:30
तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरू लागली आहे. परिणामी, एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच पारा

एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा
वर्धा : तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरू लागली आहे. परिणामी, एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. रविवारी जिल्ह्यात ४३ अंश तापमानाची नोंद झाली. यामुळे एप्रिल महिन्यातच नागरिकांना मे हिटचा तडाखा सोसावा लागत असल्याचे बोलले जात आहे.
मार्च महिन्यापासून तापमान वाढायला सुरुवात होते. एप्रिलमध्ये ताममान ३५ ते ३८ अंशांच्या मधे राहते तर मे महिन्याच्या प्रारंभापासून पारा ४० ते ४५ अंशांच्या आसपास असतो, असा अनेक वर्षांपासूनचा अभ्यास आहे; पण या दोन ते तीन वर्षांत एप्रिलमध्येच ४० अंशांच्या वर तापमान पोहोचायला सुरुवात झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्ण वारे वाहत असल्याने पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. शनिवारी या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वाधित तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, जे तापमान मे महिन्यात असते, ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सहन करावे लागत असल्याने नागरिकही हवालदिल झाले आहेत. परिणामी, मे हिटचा तडाखा एप्रिल महिन्यातच सोसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. यामुळे स्वत:ची काळजी घेत आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे.(शहर प्रतिनिधी)
शासकीय रुग्णालयात शीतकक्ष स्थापन
४कितीही उन्ह तापत असले तरी नियमित कामे ही करावीच लागतात; पण उन्हाचा तडाखा लक्षात घेता घरून निघताना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते. धकाधकीच्या जीवनात ही काळजी घ्यायलाही वेळ मिळत नसल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. हीच बाब हेरून शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांकरिता शीतकक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा नागरिक व रुग्णांना लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.
पाणी भरपूर पिण्याचा सल्ला
४शक्य होईल तेवढा उन्हाचा संपर्क टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे; पण कामे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी कधीतरी घराबाहेर पडावेच लागते. यामुळे घराबाहेर पडताना भरपूर पाणी प्या, तसेच पाणी नेहमी जवळ बाळगा, असा सल्ला डॉक्टरांद्वारे दिला जात आहे. सोबतच पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे खाण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत.
मे महिन्याची आतापासूनच धास्ती
४मे महिन्याचं उन्ह एप्रिल महिन्यातच सोसावे लागत असल्याने मे महिन्यात तापमान किती राहील आणि त्याचा सामना कसा करावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याचा परिणाम मे महिन्यातील कामांवर होणार असल्याची शक्यता बळावली आहे. गरजेचे नाही, अशी शक्य होईल तेवढी कामे टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पक्ष्यांच्या जीवितास धोका
४४० अंशावर तापमान गेल्यावरच पक्ष्यांचे हाल व्हायला लागतात. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. अशावेळी त्यांना लवकर पाणी न मिळाल्यास त्यांंंच्या जीवितास धोका होतो. यामुळे प्रत्येकाने घरासमोर, बाल्कनीत पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी, प्राणी मित्र करीत आहेत.
४प्राणीदेखील अन्न व पाण्याच्या शोधात दाही दिशा फिरत असतात. अशावेळी कधी-कधी पाण्याच्या शोधात ते खूप दूर निघून गेल्यामुळे रस्ताही विसरतात. परिणामी, सैरावैरा पळत सुटल्याने त्यांचे अपघात होण्याचा धोका हा अधिक असतो. प्राणी आणि पक्ष्यांच्या मृत्यूच्या सर्वाधिक घटना उन्हाळ्यातच घडत असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे पाणी ठेवणे गरजेचे आहे.