शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करा
By Admin | Updated: November 23, 2015 01:52 IST2015-11-23T01:52:50+5:302015-11-23T01:52:50+5:30
शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि आत्महत्या याची तर्कशुद्ध आणि तत्वशुद्ध उकल करणारा स्वामीनाथन आयोग संयुक्तपणे शासनाला जागे करण्यासाठी ..

शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करा
कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि आत्महत्या याची तर्कशुद्ध आणि तत्वशुद्ध उकल करणारा स्वामीनाथन आयोग संयुक्तपणे शासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष समिती आणि जनमंचच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ व ‘अलग अँगल’ या दोन संस्थानी सुद्धा सदर आंदोलन तीव्र करण्यासाठी मदतीचा हात समोर केला आहे. कारंजा तालुक्यातूनही शेतकरी हिताचा असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करण्यासाठी जोर वाढू लागला आहे.
८ आॅक्टोबर २०१५ रोजी अमरावती येथे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक हजार भूमिपुत्रांनी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या अधीपत्याखाली एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, अॅड. अनिल किल्लोर, अविनाश जोगदंड, आपुलकीचे संस्थापक अध्यक्ष व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे मुख्य प्रेरक अभिजीत फाळके, अमिताभ पावडे, गिरीधर पाटील, गजानन अमदाबादकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व शेतकरी आत्महत्या यावर प्रकाश टाकून, उपाययोजना सुचविल्या. यावेळी या सर्व समस्याची उकल असणारा स्वामीनाथन आयोग, शासनाने त्वरित लागू करावा, अशी आग्रही भूमिकाही मांडण्यात आली.
त्यानंतर हाच वसा धरून ३० आॅक्टोबरला जनमंच व भूमिपूत्र संंघर्ष वाहिनीने प्रत्येक जिल्हा व तालुका स्थळी आंदोलन करुन अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देवून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी रामबाण असलेला ‘स्वामीनाथन आयोग’ लागू करा, अन्यथा आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. लोकमतच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. या चर्चेत ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ आणि ‘अलग अँगल’ या संस्थानी सक्रीय सहभाग घेवून हा आयोग शासनाने त्वरीत लागू करावा नशी मागणी केली. तसेच ७ डिसेंबरला ग्राम आर्ट प्रोजेक्टरच्या संचालिका श्वेता भट्टड ‘भारत मातेच्या’ वेशात स्वत:ला जमिनीमध्ये गाडून घेणार आहेत. श्रमिक एल्गार चंद्रपूरच्या पारोमिता गोस्वामीही या आंदोलनात सक्रीय राहणार आहेत.(तालुका प्रतिनिधी)