मोफत प्रवास योजना लागू करा
By Admin | Updated: December 13, 2015 02:15 IST2015-12-13T02:15:49+5:302015-12-13T02:15:49+5:30
शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते.

मोफत प्रवास योजना लागू करा
विद्यार्थिनींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
वर्धा : शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मोफत प्रवास योजना लागू करावी, अशी मागणी महिला आश्रम अध्यापक विद्यालय व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनाद्वारे केली.
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाकरिता मुलींना दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास योजना शासनाने लागू केली आहे. असे असले तरी त्यापुढील पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मुलींना मोफत प्रवासाची कोणतीही तरतूद शासनाने केली नाही. शहराच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींकडे जाण्या-येण्याकरिता लागणाऱ्या प्रवासखर्चाची सोय नाही. त्यामुळे त्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकत नाही. शिकण्याची तीव्र इच्छा असतानादेखील मुलींना पैशाअभावी शिक्षण सोडावे लागते. यात अनेक प्रज्ञावंत विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे स्वाती अभय योजना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लागू व्हावी तसेच पदवीपर्यंतचा प्रवास खर्च शासनाकडून मोफत असावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी महिला आश्रमच्या प्रा. सुचिता राऊत, प्रा. रिना परतेती, प्रा. साधना मेंढे, प्रा. माधुरी देशमुख, छात्राध्यापक स्रेहलता जांभूळकर, कीर्ती बालपांडे, लीना पाटील, माहेश्वर करलुके, मयुरी पाळेकर, प्रगती तेलरांधे, ममता भटेरा, वैशाली देशमुख, प्राजक्ता शेंडे, वृषाली मानकर, वृंदा ठाकरे, रक्षदा मून, मनीषा कुर्जेकर, शबनम शेख आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)