१०० फूट अंतरावरच खोदली दुसरी विहीर; ओलित प्रभावित
By Admin | Updated: April 30, 2015 01:53 IST2015-04-30T01:53:51+5:302015-04-30T01:53:51+5:30
दोन शेतांमध्ये असलेल्या विहिरींमध्ये किमान ५०० फुट अंतर असावे, असा नियम आहे;

१०० फूट अंतरावरच खोदली दुसरी विहीर; ओलित प्रभावित
सिंदी (रेल्वे) : दोन शेतांमध्ये असलेल्या विहिरींमध्ये किमान ५०० फुट अंतर असावे, असा नियम आहे; पण मौजा डोरली येथे १०० फुट अंतरावर शेतकऱ्याने विहीर खोदली़ यामुळे पूर्वी जुन्या विहिरीचे पाणी तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़
विजय पुसाराम बोरकर यांचे मौजा डोरली सर्व्हे क्ऱ १०९ मध्ये आराजी ४.०८ हे.आर. शेत आहे़ या शेतात १५ वर्षांपासून विहीर आहे़ शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो़ त्यांच्या शेतालगत किशोर श्रीराम बोरकर यांचे शेत आहे़ त्यांनी नियमांना तिलांजली देत विजय यांच्या विहिरीपासून केवळ १०० फुट अंतरावर विहीर खोदली़ शिवाय विहिरीमध्ये आडवे बोअर करून जुन्या विहिरीतील पाणी पळविले़ यामुळे विजय बोरकर यांना ओलितापासून वंचित राहावे लागले़ याबाबत वरिष्ठ भुवैज्ञानिक वर्धा, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली; पण अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही़ शेतात खोदलेल्या विहिरीपासून ५०० फुटाच्या आत भूजल अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार दुसऱ्या विहिरीचे खोदकाम वा बांधकाम करता येत नाही, असा नियम आहे; पण किशोर बोरकर यांनी १०० फुट अंतरावरच विहीर खोदली़
यामुळे नवीन विहिरीचे खोदकाम व बांधकाम हे बेकायदेशीर असून ती विहिर त्वरित बुजविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़ जिल्हा प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शेतकरी विजय बोरकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़(प्रतिनिधी)