अंनिसच्या प्रबोधनाने घरावरील दगडफेक थांबली
By Admin | Updated: June 29, 2015 02:36 IST2015-06-29T02:36:10+5:302015-06-29T02:36:10+5:30
तालुक्यातील तास येथे गत चार दिवसांपासून एका घरावर दगडफेक सुरू होती.

अंनिसच्या प्रबोधनाने घरावरील दगडफेक थांबली
तास येथे चार दिवसांपासून सुरू होता प्रकार
समुद्रपूर : तालुक्यातील तास येथे गत चार दिवसांपासून एका घरावर दगडफेक सुरू होती. यात भानामती झाल्याच्या संशयाने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसात तक्रारही करण्यात आली. अखेर अ.भा. अंनिसच्यावतीने शुक्रवारी गावात घेतलेल्या प्रबोधन सभेनंतर होणारी दगडफेक बंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
तास येथील चंपत धोटे या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराच्या छतावर मंगळवारी रात्रीपासून अचानक दगडफेक सुरू झाली. हा प्रकार एका दिवसाचा नाही तर रोजचाच झाला. गावकऱ्यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली. ठाणेदार जिट्टावार यांच्या उपस्थितीत तपास करण्यात आला. येथेही काहीच निष्पन्न झाले नाही. दगडफेक सुरूच होती. या प्रकाराची माहिती अ.भा. अंनिसचे जिल्हा संघटक व शासनाच्या पीआयएमसी समितीचे जिल्हा संयोजक पंकज वंजारे यांना मिळाली. यावरून समुद्रपूर तालुका संघटक प्रफुल कुडे, सचिन डेकाटे, अध्यक्ष उमेश पोटे, प्रितम रंगारी, अमोल डोंगरे, कृष्णा धुळे, शुभम वाढई, राम गाडेकर, मनोज भोयर आदी कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. या त्यांना गावातील एकावर संशय आला. आलेल्या संशयाची खात्री केली. गावात शांतता राहावी याकरिता दगड फेकणाऱ्यांचे नाव उघड केले नाही. यानंतर वंजारे यांनी ग्रा.पं. सदस्य मनीष नांदे यांच्या अध्यक्षतेत गावात सभा घेतली. त्यांनी हा प्रकार भानामती नसून मानवी विकृतीतून घडत असल्याचे सांगितले. यानंतर अचानक गावातील दगडफेक बंद झाली.
प्रकरणात अ.भा. अंनिसचे जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल, शुभम वाढई, निखिल महाजन, प्रितम लोहकरे, कुणाल बोधे, मनीष नांदे, गौरव ईसपाडे, गजानन गारघाटे, प्रवीण लढी, विपीन तुपे, शुभम सोरते, बादल वानकर, संजय ठोंबरे, विजय राऊत, यांच्यासह समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)