जिल्ह्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:16+5:30

लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्र्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात.

Animals at risk of 'Lumpy Skin Disease' in the district | जिल्ह्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा धोका

जिल्ह्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा धोका

ठळक मुद्देविषाणूमुळे होतो आजाराचा प्रसार : जिल्ह्यातील तीन तालुक्यात आढळली रोगाची लक्षणे, शेतकरी, पशुपालकांमध्ये भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संक्रमणाचा मानवाने धसका घेतला असतानाच जनावरांना विषाणूजन्य लम्पी स्कीन डिसीजचा धोका बळावला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू या तालुक्यांमध्ये जनावरांना हा रोगसदृश लक्षणे आढळून आली आहेत. या आजारावर औषध उपलब्ध नाही. परिणामी, शेतकरी आणि पशुपालक धास्तावले आहेत. शेतकरी, पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्र्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा रोग सर्व वयोगटातील गोवंशीय जनावरांना होतो. लहान वासरे या रोगास अधिक प्रमाणात बळी पडतात. उष्ण, दमट वातावरणामध्ये जेव्हा कीटकांची वाढ अधिक प्रमाणात होते. दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हिवाळ्यात थंड वातावरणामध्ये या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो.
या आजाराचा प्रसार एका जनावरापासून दुसºया जनावराला होत असून चावणाºया माशा, डास, गोचिड, कीटक यांच्यामुळे याचा प्रसार होतो. या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काही वेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजननक्षमतासुद्धा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात. हा रोग झुनोटिक रोग प्रकारातील नसल्याने माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव मुळीच होत नाही.
या विषाणूंचे संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये राहत असून त्यानंतर शरीराच्या इतर भागामध्ये संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होते. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची शक्यता असते. हा रोग विषाणूजन्त असल्याने त्यावर प्रभावी औषध उपलब्ध नाही. तरीही इतर रोगांबरोबर गुंतागुंत होऊ नये म्हणून लक्षणांवर आवश्यक उपचार तातडीने केल्यास जनावर पूर्णपणे बरे होते. प्रतिजैविके, ज्वरनाशके, अ‍ॅण्टीहिस्टेमिनिक औषधे, रोगप्रतिकार शक्तीवर्धक जीवनसत्व अ व ई, तसेच त्वचेवरील व्रणासाठी अण्टीसेप्टिक/फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करण्यात येतो. तोंडात व्रण झाल्यास २ टक्के पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने धुवावे, त्यानंतर तोंडामध्ये बोरोग्लिसरीन लावावे. शेतकरी पशुपालकांनी या लम्पी स्कीन डिसीजला मुळीच घाबरून न जाता तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे, अतिरिक्त मुख्य कायकारी अधिकारी, सत्यजीत बडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे, पशुधन विकास अधिकारी, डॉ. बी.व्ही. वंजारी आणि डॉ. पी.आर. वानखेडे यांनी केले आहे.

अशी आहेत रोगाची लक्षणे
प्रथम जनावरांचे डोळे नाकातून पाणी येते, लसिका ग्रंथींना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो, दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू १० ते ५० मि.मी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. व्रणामुळे चिपडे येतात. दृष्टी बाधित होते. पायावरील व्रणांमुळे सांधे व पायामध्ये सूज येऊन जनावरे लंगडतात. प्रादुर्भावामुळे जनावरात फुफ्फुसदाह किंवा कायदाहाची बाधा होऊ शकते. रक्तातील पांढºया पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.

मागील पाच ते दहा दिवसांपासून वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर, हिंगणघाट व सेलू तालुक्याच्या काही भागात जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज रोगसदृश लक्षणे दिसून येत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
माधव चंदनखेडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, जि.प., वर्धा.

लम्पी स्कीन डिसीज हा रोग झुनोटिक रोग प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये मुळीच प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी पशुपालकांनी या रोगाला मुळीच घाबरून न जाता, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा.
डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प., वर्धा

Web Title: Animals at risk of 'Lumpy Skin Disease' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.