ऐन दिवाळीत एटीएम ‘आऊट आॅफ सर्व्हिस’
By Admin | Updated: November 10, 2015 02:45 IST2015-11-10T02:45:02+5:302015-11-10T02:45:02+5:30
ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ऐन दिवाळीत एटीएम ‘आऊट आॅफ सर्व्हिस’
ग्राहकांची फजिती : बँकेत नागरिकांची रीघ
वर्धा : ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. एटीएममधून होणारे व्यवहार ठप्प झाल्याने बँकेत ग्राहकांची रीघ पाहायला मिळाली. तर धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले.
दिवाळीनिमित्त बँकेला सलग पाच दिवस सुटी आली आहे. यामुळे अनेकांनी सुविधेकरिता म्हणून जादाची रोख काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले असता तिथे ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असे फलक पाहायला मिळाले. यानंतर अन्य बँकेच्या एटीएम केंद्राचा पर्याय पाहिला असता तिथेही व्यवहार शक्य झाले नाही. राष्ट्रीयकृत बँकेव्यतिरिक्त खासगी बँकेचेही एटीएम बंद होते. काही एटीएम केंद्राला लिंक नव्हती, तर काही केंद्र ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्याने रोख विड्रॉल करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले. याबाबत बँकेत विचारणा केली असता तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत ग्राहकांची बोळवण करण्यात आली. काही ग्राहकांनी शहरातील सर्व एटीएम केंद्र पालथी घातली; मात्र मनस्ताप करण्याशिवाय पर्यायच नव्हता. गतवर्षी दिवाळीच्या सणाच्या काळात एटीएम केंद्राला बंदची घरघर लागली होती. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँक कार्यालयात जावे लागले होते. यंदाही असाच प्रकार घडत असल्याने बँक कार्यालयात ग्राहकांच्या रांगा होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)
धनत्रयोदशीला खरेदीचे खास महत्त्व असते. सोने-चांदी खरेदीला विशेष मान असतो. शिवाय घरात आज एकतरी वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. खरेदीकरिता निघालेल्या ग्राहकांना एटीएम केंद्र बंद असल्याने मनस्ताप झाला. शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्र बंद असल्याने खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. याबाबत विचारणा करण्याकरिता गेलेल्या ग्राहकांना तांत्रिक अडचण असल्याचे सांगत समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वेळेचा अपव्यय
ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये. तसेच त्यांना कमी अंतरात रोख व्यवहार करता यावे म्हणून बँकेच्यावतीने ठिकठिकाणी एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. मात्र त्याला बंदची घरघर असल्याने अनेकदा ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय आजही आल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला.
दिवाळीच्या काळात आर्थिक व्यवहार अधिक होतात. खात्यातून रक्कम विड्रॉल करण्याकरिता ग्राहकांच्या दरवर्षी बँकेत रांगा असतात. हा ताण कमी करण्याकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली. मात्र या सेवेत वारंवार व्यत्यय येत असल्याने ग्राहकांकरिता ही सेवा सणासुदीच्या काळात डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते.