अनिल भोस्कर यांची आत्महत्या नसून घातपात
By Admin | Updated: November 1, 2014 02:09 IST2014-11-01T02:09:41+5:302014-11-01T02:09:41+5:30
हिंगणघाट येथील भारत माता दिनांत विद्यालयाचा शिपाई अनिल गुलाबराव भोस्कर यांचे शाळेच्या कार्यालयातील संशयास्पद आत्महत्या प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता आहे.

अनिल भोस्कर यांची आत्महत्या नसून घातपात
वर्धा : हिंगणघाट येथील भारत माता दिनांत विद्यालयाचा शिपाई अनिल गुलाबराव भोस्कर यांचे शाळेच्या कार्यालयातील संशयास्पद आत्महत्या प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता आहे. त्यांची पत्नी सविता भोस्कर यांनी पतीची हत्या नसून यामागे घातपात असल्याचा आरोप शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
या प्रकरणी हिंगणघाट येथील भारत माता दिनांत विद्यालयाचे शिक्षक यशवंत बालपांडे व भिमराव सातपुते, मुख्याध्यापक मधुकर बोरूसकर यांच्यासह धारकर व अन्य जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, अनिल भोस्कर हे २७ आॅक्टोबरला रात्री जेवण करून रात्री ८.३० वा. ड्युटीवर भारत विद्यालय येथे गेले. २८ आॅक्टोबरला सकाळी ७ वा. ड्युटीवरून परत आले. त्याच दिवशी सकाळी ८.४५ वा. शाळेतून फोन आला व शाळेत मुख्याध्यापकांनी काही कामानिमित्त बोलविले. ते नाश्ता करून सकाळी ९ वा. शाळेत गेले. लगेच केवळ अर्ध्यां तासातच म्हणजे ९.३० वा. त्यांनी शाळेत आत्महत्या केल्याची वार्ता आली, याकडेही सविता भोस्कर यांनी लक्ष वेधले.
वास्तविक, घरी असे कोणतेही आत्महत्या करण्यासारखे वातावरण नव्हते. गेल्या ४-५ महिन्यांपासून संस्थाचालक व मुख्याध्यापक पती अनिल यांना नोकरी सोड नाही तर आम्ही काढून टाकू, अशी धमकी देत होते.
माझे पती १५ वर्षांपासून तेथे कार्यरत आहे. त्यांना आत्महत्याच करायची असती तर त्यांनी रात्रपाळीच्या ड्युटीवर असताना केली असती. ड्युटी संपली असताना त्यांना बोलविण्याचे कारण काय? घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता मृतकाचे शरीर जमिनीला टेकून होते. गालाला व शरीराला जखमा असल्याचे आढळून आले. त्यामुळे शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षक यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी तक्रारातून व्यक्त केला आहे. शाळेतील काही कर्मचाऱ्यांना शाळेत काय घडले याची माहिती आहे. ते दबक्या आवाजात चर्चा करीत आहे, पण ते सखोल काय आहे हे सांगत नाही, असे त्यांनी नमुद केले आहे.
घटनेच्या दिवशी शाळेकडून पतीच्या मोबाईलवर फोन आला होता. फोन कोणाचा आहे हे पहायला गेल्यास माझ्या पतीच्या मोबाईलचे सिम कार्ड गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत असून गैरअर्जदारावर संशय आहे. या घटनेची सखोल चौकशी करून मला व माझ्या परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणीही सविता भोस्कर यांनी केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)