संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:39 IST2015-08-25T02:39:46+5:302015-08-25T02:39:46+5:30
येथून शिक्षणाकरिता ये-जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नेण्यास परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाकडून सतत

संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली बस
सारवाडी : येथून शिक्षणाकरिता ये-जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नेण्यास परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाकडून सतत विरोध होतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी आर्वी-नागपूर बस सावली (बु.) व एकार्जुन येथील ७० ते ८० विद्यार्थ्यांनी बस महामार्गावर अडविली.
दररोज सकाळी ६ वाजता आर्वीवरून बस नागपूरकरिता निघते. आर्वीवरून व मधल्या थांब्यावरून पॅसेंजर (प्रवासी) भरून बस देववाडी, सारवाडी, पालोरा या स्टॉपवर संपूर्ण शाळेचे विद्यार्थी भरून घेते. ७० ची क्षमता असलेल्या बसमध्ये १०० विद्यार्थी पालोऱ्यापर्यंत भरतात समोरील सावली स्टॉपवर असलेले ६० ते ७० विद्यार्थ्यांना अनेकदा खाजगी वाहनाने कारंजाला जावे लागते. नंतरची आर्वी- काटोल बस ८.४५ वाजता असल्याने शाळेचा वेळ निघून जातो. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
यावर तोडगा काढण्याकरिता कारंजा येथील एका महाविद्यालयाच्या प्रशासनासह सावली (बु.) येथील पालक व विद्यार्थ्यांनी या मार्गावर एक बस देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले. यामुळे विद्यार्थ्यांनी आज बस अडविली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर आगार व्यवस्थापकाने दोन दिवसात ज्यादा बसची सावलीमध्ये पाठविण्याचे आश्वासन दिल्याने एक तास थांबविलेली बस सोडली.(वार्ताहर प्रतिनिधी)