संतप्त नागरिकांनी रोखला तासभर महामार्ग
By Admin | Updated: September 16, 2014 23:56 IST2014-09-16T23:56:41+5:302014-09-16T23:56:41+5:30
येथील राष्ट्रीय महामार्गावर नांदगांव चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची तातडीने दुरूस्ती करावी व उड्डाण पुलाच्या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी सुमारे

संतप्त नागरिकांनी रोखला तासभर महामार्ग
गतिरोधकाच्या दुरूस्तीची मागणी : १९ जणांना घेतले ताब्यात
हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावर नांदगांव चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची तातडीने दुरूस्ती करावी व उड्डाण पुलाच्या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी सुमारे तासभर रस्तारोको केला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्ता रोको करणाऱ्या १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊा न्यायालयात हजर केले.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारी प्रेमकुमार मिश्रा (६०) रा. शास्त्री वॉर्ड हे बालाजी जिनिंगमध्ये हिरो होंडा मोटारसायकल एमएच ३२ के ३८५६ ने जात होते. दरम्यान चंद्रपूर येथून वर्धेला कोळसा भरून जाणाऱ्या एमएच ३१ एपी ४८०९ ने चौकात जबर धडक दिली. त्या अपघातात प्रेमकुमार मिश्रा यांचा मृत्यू झाला. या अगोदर ४ जुलै २०१४ ला सुध्दा येथे अपघात झाला होता. सततच्या अपघातामुळे शहरातील दोन मोठ्या इंग्रजी शाळा, बाजार समिती मार्केट तसेच येथे येणाऱ्या शेतकऱ्यांत असुरक्षीतता निर्माण झाली आहे. प्रशासनाने या चौकातील गतिरोधकाची दुरूस्ती करावी या मागणीकरिता पाच महिन्यापुर्वी नागरिकांनी निवेदनही सादर केले होते; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथे दुर्घटना घडण्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रलय तेलंग, निलेश ठोंबरे, शंकर मोहमारे, सुनील डोंगरे, चेतन वाघमारे, मारोती साठे, ज्ञानेश्वर पुंड, रंजीत बेले, विनोद राऊत, सरवर खान, सुरेश पुंड, नितीन वाघ, गिरीश नागुलवार, उमेश मंगरुळकर, चंदु भुते, माणिक महाकाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखुन धरली.
ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून १९ जणांना भादंविच्या ३४१,१४३ व मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ अन्वये ताब्यात घेवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. आंदोलकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. (तालुका प्रतिनिधी)