अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली तहसीलदाराच्या पत्रांची होळी
By Admin | Updated: November 1, 2015 02:28 IST2015-11-01T02:28:25+5:302015-11-01T02:28:25+5:30
अंगणववाडी कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दिवाळीपूर्वी करण्याच्या मागणीसह राष्ट्रीय कार्यक्रमातील लोकसंख्या अद्ययावतीकरणाच्या कामात ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली तहसीलदाराच्या पत्रांची होळी
जिल्हा कचेरीसमोर आंदोलन : विविध मागण्यांचे निवेदन सादर
वर्धा : अंगणववाडी कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दिवाळीपूर्वी करण्याच्या मागणीसह राष्ट्रीय कार्यक्रमातील लोकसंख्या अद्ययावतीकरणाच्या कामात अंगणवाडी सेविकांसह आशा वर्करांवर जबरदस्ती करू नये, असे म्हणत समुद्रपूर व हिंगणघाट येथील तहसीलदारांचा निषेध नोंदविण्यात आला. याचवेळी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीची होळी आयटकच्यावतीने शनिवारी करण्यात आली.
यावेळी आयटकच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासह त्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. अंगणवाडी सेविकांची नियुक्ती ज्या कामाकरिता करण्यात आली तिच कामे त्यांना देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोबतच आशा वर्करचे मानधन व त्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, शिवाय शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चात आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्यक्ष विजया पावडे, कार्याध्यक्ष गुणवंत डकरे यांच्यासह प्रमुखांनी विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी मागण्या मान्य करण्याकरिता लढा अधिक तीव्र करावा लागणार असल्याचे सांगितले.
या मोर्चात आयटकचे जिल्हा सघटक असलम पठाण, जिल्हा सचिव वंदना कोळणकर, मैना उईके, मंगला इंगोले, संध्या म्हैसकर, प्रतिमा वाघमारे, वैशाली कडू, योगीता डहाके, वैशाली जंदरे, सुनंदा वाघमारे, ज्ञानेश्वर डंभारे, इरफाना पठाण, सुनंदा आखाडे, रेखा काचोळे, रंजना तांबेकर, सुरेखा रोहणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)