अंगणवाडी सेविकांना चार महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 21, 2014 22:57 IST2014-10-21T22:57:58+5:302014-10-21T22:57:58+5:30
प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबिज भेटही अद्याप मिळाली नाही.

अंगणवाडी सेविकांना चार महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा
सेलू : प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबिज भेटही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अतिशय अल्प मानधन मिळत असून जून २०१४ पासून मानधनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. काही कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा अर्धा पगार मिळाला तर काहींना पूर्ण पगार देण्यात आला आहे. अंगणवाडीमध्ये कार्यरत सेविका व मदतनीस ह्या बहुतांश गरजवंत असताना त्यांना चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसत आहे. वेतनवाढीसाठी तसेच वेळेवर वेतन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा जिल्हा व राज्यस्तरावर आंदोलने केली. परंतु प्रत्येक वेळी आश्र्वासनच देण्यात आले. गावातील कुपोषण नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर योजना आखण्यात येते व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी गावस्तरावर अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधन वाढ करावी, या मागण्या प्रलंबित आहे. वेतन वेळेवर होईल, असे शासनाकडून आश्र्वासन देण्यात आले परंतु चार महिन्यांपासून निधीअभावी मानधन अडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या नसून त्यांचे काम थंडबस्त्यात आहे. अंगणवाडी सेविकांचे चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने त्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी प्रतिक्रिया सेविका आणि मदतनिसांमधून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)