...अन् त्यांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
By Admin | Updated: November 2, 2016 00:36 IST2016-11-02T00:36:43+5:302016-11-02T00:36:43+5:30
दिवाळी प्रकाशाचा सण. या सणाला प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो; मात्र काहींवर या दिवशीही दोन वेळच्या जेवणाकरिता झुंज देण्याची वेळ येते.

...अन् त्यांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
सेवा फाऊंडेशनचा उपक्रम : ऐन दिवाळीच्या दिवशी मिळाली रस्त्यावर जगणाऱ्यांना भेट
वर्धा : दिवाळी प्रकाशाचा सण. या सणाला प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो; मात्र काहींवर या दिवशीही दोन वेळच्या जेवणाकरिता झुंज देण्याची वेळ येते. अशाच कुटुंबांना त्यांच्या विचारात नसताना अचानक एखादी भेट मिळाल्यास त्यांचा आनंद गगणात मावणारा नसतो. असाच काहीसा आनंद वर्धेतील सेवा फाऊंडेशनच्या कार्याने शहरालगत असलेल्या हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना झाला. आकस्मिक मिळालेल्या या भेटीमुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूच तरळले.
स्थानिक सेवा फाऊंडेशन व स्वामी मुक्तानंद योगाध्यात्मक केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिशय दुर्बल घटकांच्या जीवनात काही क्षण का होईना, दिवाळीच्या आनंदाचा अनुभव दिला.
समाजामध्ये विविध स्तरातील लोक आपापल्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपल्या परिसरात असे अनेक नागरिक आहेत, ज्यांना दोन वेळच्या जेवणाचीही सोय नाही. अशा वंचित समाज बांधवाविषयी आपले काही उत्तरदायीत्व आहे, या उदात्त भावनेने काही व्यक्ती सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्र आल्या. त्यांनी वेगवेगळ्या गावातील १०१ कुटुंबांना दिवाळीसाठी रवा, साखर, तेल, डालडा, चना डाळ, मैदा, चिवडा, लाडू, खोबरा तेल, नवीन कपडे, आंघोळ व कपड्याचे साबण अशा जीवनावश्यक साहित्याचे बॉक्स तयार केले. ते बॉक्स मांडवा, पाचोड, कृष्णापूर, खैरी, गौरखेडा, सालदरा, सालोड (हि.), पिपरी (हनुमान गड), कारला आदी दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबांना प्रत्यक्ष जात दिले. यात विशेषत: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा समावेश असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने कळविण्यात आले आहे.
अचानक व कुठलीही कल्पना नसताना अनपेक्षित मिळालेल्या मदतीमुळे या कुटुंबांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. यावेळी अनेकांनी आपल्या जीवनातील दु:ख सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांकडे व्यक्त करीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात असेही वंचित घटक असून आपण आजपर्यंत त्यापासून अनभिज्ञ होतो, त्यांच्याविषयी आपली काही कर्तव्य भावना आहे, अशी जाणीव फाऊंडेशनच्या सदस्यांना झाली.
या उपक्रमास समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी साहित्य आणि रोख स्वरूपात मदत केली. या कार्याच्या यशस्वीतेकरिता सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद आगळेकर, उपाध्यक्ष ओंकार धावडे, सचिव अनंत बोबडे, कोषाध्यक्ष संजय इंगळे, सदस्य यशवंत कडू, सुधीर वैतागे, राजू ठक, चंद्रशेखर धुळे, गणेश अतकर, विजय बाभुळकर, रामेश्वर लांडे, महेश गाडगे, प्रवीण चौधरी, हरिभाऊ देशमुख, महेंद्र चिमणे, वैशाली ठाकरे, कविता सोरते, संदीप रघाटाटे, आशीष कुचेवार, भगवंत झाडे आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)