अन् नगराध्यक्षांनी केला महिला दिनाचा कार्यक्रम रद्द
By Admin | Updated: March 9, 2016 03:04 IST2016-03-09T03:04:11+5:302016-03-09T03:04:11+5:30
येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी एका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अन् नगराध्यक्षांनी केला महिला दिनाचा कार्यक्रम रद्द
वर्धा पालिकेतील प्रकार : संतप्त नगरसेविकांनी नोंदविला निषेध
वर्धा : येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी एका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून वितरित करण्यात आल्या होत्या. या पत्रिकेमध्ये एका नगरसेविकेचे नाव नसल्याचा मुद्दा उचलून धरत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी हा कार्यक्रमच रद्द केल्याचा आरोप इतर नगरसेविकांनी पालिकेत केला. या संतप्त नगरसेविकांनी निषेध नोंदवित महिलादिनी एका महिलेनेच महिलांचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली.मात्र कार्यक्रम रद्द करण्यात आला नसून तो पुन्हा घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण समितीच्यावतीने सभापती शीला गुजर, प्रकल्प अधिकारी ठाकरे व नगर सेविकांनी संयुक्तरित्या जागतिक महिला दिन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापून वितरित केल्या. या पत्रिकेमध्ये एका नगरसेविकेचे नाव नसल्याचे कारण पूढे करीत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी हा कार्यक्रम रद्द केला. शिवाय कुणाचे नाव सुटले, हे देखील सांगितले नाही, असा आरोप शिला गुजर, माया उमाटे, राखी पांडे यांच्यासह अन्य नगरसेविकांनी केला. या कार्यक्रमाकरिता शहरातील विविध वॉर्डातून तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित झाल्या होत्या; पण कार्यक्रमच रद्द केल्याने त्यांना परतावे लागले. पालिकेद्वारे आयोजित कार्यक्रम रद्द झाल्याने चुकीचा संदेश जात असल्याचेही नगरसेविकांचे म्हणणे आहे.
वास्तविक, निमंत्रण पत्रिकेमध्ये नगरसेवक वा नगरसेविकांची नावे नाहीत. उद्घाटक म्हणून न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे तर अतिथी म्हणून न.प. आरोग्य सभापती वर्षा खैरकार, शिक्षण सभापती भारती खोंड, बांधकाम सभापती माया उमाटे, पाणी पुरवठा सठापती शुभांगी कोलते तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती गांधी, अॅड. अनिता ठाकरे, डॉ. शिवाली काशीकर यांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. विनीतमध्ये महिला व बालकल्याण सभापती शीला गुजर, उपसभापती गीता मसराम, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांची नावे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)