अन् गृह राज्यमंत्री धडकले कारंजा ठाण्यात
By Admin | Updated: July 3, 2015 02:33 IST2015-07-03T02:33:47+5:302015-07-03T02:33:47+5:30
राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे हे गुरूवारी अकस्मात स्थानिक पोलीस ठाण्यात धडकले.

अन् गृह राज्यमंत्री धडकले कारंजा ठाण्यात
अकस्मात भेटीमुळे पोलिसांची उडाली तारांबळ
कारंजा (घा.) : राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे हे गुरूवारी अकस्मात स्थानिक पोलीस ठाण्यात धडकले. यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी पोलिसांशी संवाद साधत त्यांच्या निवासस्थानांबाबत विचारणा केली. प्रवास भत्ता, वेतन आदींची चौकशी करून माहिती जाणून घेतली.
पोलीस कर्मचाऱ्यांना निवासाला वसाहतीचे बांधकाम त्वरित करण्याचे बांधकाम विभागाला सूचित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी विविध समस्यांवर चर्चा करून अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. यात अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारूविक्री, अवैध दारू विक्रेत्यांशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे, पोलीस ठाण्यातील अपूरा कर्मचारी वर्ग, महामार्गालगत अतिक्रमण, बसस्थानकासमोर रस्ता दुभाजकावर असलेली दुकाने हटविणे आदींबाबतही त्यांनी पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना सूचना दिल्या. महामार्गावरील अतिक्रमणाबाबत पोलीस महासंचालक व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात येईल, असे सांगितले. अवैध दारूविक्रेत्यांवर ३२८ अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.(शहर प्रतिनिधी)