अन् होळीतील नैवेद्य पोहोचला भुकेल्यांच्या पोटी
By Admin | Updated: March 8, 2015 01:50 IST2015-03-08T01:50:39+5:302015-03-08T01:50:39+5:30
पेटत्या होळीत नैवेद्याच्या नावावर पुरणाची पोळी टाकण्यापेक्षा ती भुकेने आग पेटलेल्या पोटात टाकणे बरे... असे म्हणत पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या महिलांनी गावात फिरून ...

अन् होळीतील नैवेद्य पोहोचला भुकेल्यांच्या पोटी
वर्धा : पेटत्या होळीत नैवेद्याच्या नावावर पुरणाची पोळी टाकण्यापेक्षा ती भुकेने आग पेटलेल्या पोटात टाकणे बरे... असे म्हणत पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या महिलांनी गावात फिरून पुरण पोळी गोळा करून ती रस्त्यावर जगणाऱ्यांना दिली. या सणाच्या दिवशी आपल्याला कोणी गोड देईल का, असा प्रश्न खिन्न मनात घेवून असलेल्यांना ही पुरण पोळी मिळताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुरुवारी रात्री शहरातील रेल्वे स्टेशन व मंदिराबाहेर बसून माधवगिरी करणाऱ्यांना होळीतून गोळा करण्यात आलेली पुरण पोळी देण्यात आली.
होळीच्या दिवशी धार्मिक भावना म्हणून बरेच जण साखरगाठी व पुरणाची पोळी नैवद्य म्हणून टाकतात. भुकेली पोटं असताना अन्न आगीत टाकणे योग्य नाही, असे म्हणत पिपरी (मेघे) येथील सरपंच व सदस्यांनी एकत्र येत होळीजवळ गोळा होत तिथे येणाऱ्या नागरिकांना अन्नाचे महत्त्व विषद करीत त्यांच्याकडून पुरणाची पोळी घेतली. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काही भागात याला सहकार्य मिळाले तर काही भागात अपयश आले. ज्या भागात सहकार्य मिळाले त्या भागातून गोळा केलेली पुरण पोळी सरपंचासह सदस्य व परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येत रेल्वे स्टेशन, साईमंदिर व गजानन महाराज मंदिराबाहेर असलेल्यांना दिली. यावेळी सरपंच कुमूद लाजूरकर, उपसरपंच अजय गौळकर यांच्यास परिसरातील उज्ज्वला लोहकरे, वर्षा हिवंज, उषा साटोणे, निलिमा डुकरे, अरुणा जुमडे, ज्योती ढुमणे, शिल्पा गौळकर, संगिता पडोळे, मेघा हरणे सुजाता वटाणे, सविता कालिनकर व परिसरातील महिलांची उपस्थिती होती. पिपरी येथील महिलांनी एकत्र येत राबविलेल्या या उपक्रमाला अंनिसचे सहकार्यही लाभले. हा उपक्रम दर वर्षीच राबविण्याचे संकल्प करण्यात आला.(प्रतिनिधी)