पुराणातील मिथके म्हणजे विज्ञान नव्हे
By Admin | Updated: February 7, 2015 01:27 IST2015-02-07T01:27:32+5:302015-02-07T01:27:32+5:30
पुराणतगं्रथातील मिथके ही संशोधकवृत्तीने तपासून पाहिल्यास त्यातील फोलपणा लक्षात येतो. म्हणूनच मिथक हा साहित्य संस्कृतीचा एक भाग असू शकतो, ...

पुराणातील मिथके म्हणजे विज्ञान नव्हे
वर्धा : पुराणतगं्रथातील मिथके ही संशोधकवृत्तीने तपासून पाहिल्यास त्यातील फोलपणा लक्षात येतो. म्हणूनच मिथक हा साहित्य संस्कृतीचा एक भाग असू शकतो, पण या कल्पना म्हणजे विज्ञान नव्हे, असे प्रतिपादन परभणी येथील लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांनी केले.
स्थानिक शिववैभव सभागृहात बुधवारी यशवंतराव दाते स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम सत्रात ते बोलत होते. डॉ. खंदारे यांनी साहित्य आणि समाज यातील समकालीन संदर्भ या विषयावर संवाद साधला. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, ज्येष्ठ समाजसेवी डॉ. सतीश गोगुलवार, समीक्षक वंदना भागवत, कादंबरीकार मनोहर पाटील, कवी श्रीकांत देशमुख, कथाकार साधना कामत, मालविका देखणे, प्रा. शेख हाशम, संजय इंगळे तिगावकर, प्रा. राजेंद्र मुंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. खंदारे म्हणाले धर्मसत्ता, राजसत्ता, समाजसत्ता आणि शिक्षणासारख्या उपयोजक सत्ता याची महत्वपूर्ण भूमिका आपल्या जीवनात असते. धर्मसत्ता मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी असते. मात्र जी धार्मिक सहिष्णुता प्राचीन आणि संत साहित्यात होती ती आजच्या साहित्यात दिसत नाही. धर्माच्या नावावर माणसे रक्तबंबाळ होत आहेत. राजसत्ता आणि समाजसत्ता मानवाला निराश करीत आहे, तर शिक्षणसत्ता स्वत:च दिशाहीन झाली आहे. अशावेळी नव्याने संस्कृतीची जमीन कसण्याची आणि विचारांचे बियाणे रूजविण्याची जबाबदारी साहित्याला स्वीकारावी लागेल. वर्तमानकालीन समस्याचे उत्तर साहित्यातून आले पाहिजे. या विचारांची दखल शासनाने आणि समाजाने घेतली पाहिजे. या साहित्यातील विचारांची चळवळ निर्माण झाली पाहिजे. तरच, साहित्याची नाळ समाजाशी जोडली जाईल, असे मत डॉ. खंदारे यांनी मांडले.
प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले. व्याख्यानमाला माजी आमदार सुरेश देशमुख, जयंत साळवे, किशोर माथनकर, राम जाधव, डॉ. सतीश पावडे, सुनिता इथापे, विजय मुळे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी हेमंत दाते, प्रा. बाबाराव बेले, प्रकाश येंडे, शेषराव बिजवार, रंजना दाते, प्रशांत पनवलकर, डॉ. पुनसे, प्रा. गावंडे आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)