पावसाच्या सरी ठरल्या पिकांना अमृतधारा
By Admin | Updated: July 21, 2015 02:47 IST2015-07-21T02:47:20+5:302015-07-21T02:47:20+5:30
गत महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतात उगविलेले अंकुर मरणासन्न अवस्थेत आले होते. यामुळे शेतकऱ्यांवर

पावसाच्या सरी ठरल्या पिकांना अमृतधारा
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : २.७६ लाख हेक्टरवरील पिकांना संजीवनी; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
वर्धा : गत महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतात उगविलेले अंकुर मरणासन्न अवस्थेत आले होते. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट गडद होण्याचे संकेत मिळत होते. अशात जिल्ह्यात काही भागात रविवारी रात्री व तर काही भागात सोमवारी सकाळी आलेल्या पावसाने पिकांना संजीवणी मिळाली. पावसाच्या आलेल्या या सरी पिकांकरिता जणू अमृतधाराच ठरल्या.
महिन्यापासून आकाशात ढग दाटून येत होते. ढग येताच पाऊस येईल, असे वाटत असताना पावसाचा टिपूसही येत नव्हता. सायंकाळच्यावेळी कधी येणारा थंड वारा कुठेतरी पाऊस आला याची आठवण देत होता. मात्र जिल्ह्यात कुठे पाऊस आला याची नोंद होत नव्हती. मृगाच्या प्रारंभी आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. पेरण्या उगविल्यानंतर पाऊस येईल, असे वाटत असताना पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली.
आज पाऊस येईल उद्या येईल, असे वाटत होते. शेतकऱ्यांच्या नजरा रोज आभाळात जमणाऱ्या ढगाकडे जात होत्या. मात्र ढगातून पावसाचा थेंबही पडत नव्हता. पावसाच्या प्रतीक्षेत शेतातील पीक वाळण्याच्या स्थितीत आले. ज्याच्याकडे ओलिताची सोय होती तो बियाण्यांचे अंकूर वाचविण्याकरिता प्रयत्न करताना दिसला. शेतातील पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होते; मात्र ढगातून पाणी बरसत नव्हते.
पाऊस येताच आपल्या पिकांना त्याचा लाभ व्हावा, या आशेत डवरणी व निंदण करून शेतकरी मोकळा झाला. अशात आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याचे दिसताच त्याची चिंता आणखी वाढली. तहान भूक हरविली. अखेर शेतकऱ्यांवर येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ आली. वरूण राजा रूसला असल्याने कोरडवाहून क्षेत्रातील पिके करपू लागली तर डोबण साधत नसल्याने बहुतांश क्षेत्रात पीक लागवडीत अंतर पडू लागले. ते तसेच राहिल्याने उत्पन्नात घट येणार हे निश्चित असताना पुर्नवसु नक्षत्राने ही शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले. अन् चिंतेत भर पडू लागली.
आर्थिकदृष्ट्या हवालदिल असलेल्या बळीराजाला सतत तीन वर्षांपासून निसर्गही साथ देत नाही. याची प्रचिती येवू लागली. मृग नक्षत्र संपले अन् पावसाने पाठ फिरविली. तो पुष्य (एक) नक्षत्र सुरू होताच पावसाच्या रिमझिम सरीने सुरुवात झाली. यामुळे पिकांची खुंटलेली वाढ आता या पावसामुळे होण्यास मदत होणार असून पिकांना एकप्रकारे अमृत मिळाल्याने शेतकऱ्यातही समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही पिकांना दमदार पावसाची गरज आहे. जर पुन्हा पावसाने दडी मारली तर सलग चौथ्यावर्षी सुद्धा नापिकीला समोरे जाण्याची वेळी येणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वाढ खुंटलेली पिके जगणार
४मृगात आलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्या उगविल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने ओलावा संपत जमिनी भेगाळल्या जावू लागल्या. काही भागातील पिकांची वाढ खुंटली तर ओलावा नसलेल्या जमिनीतील पिके करपल्या जावू लागली. सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस पिकांकरिता संजीवणी ठरणार असून पिकांची खुंटलेली वाढ होण्यास मदत होईल. यामळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
उत्पन्नात घट निश्चित
४बियाणे अंकूरल्यावर या अंकूराच्या वाढीकरिता पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. यामुळे दिवसानुसार रोपटे वाढली नाहीत. याचा परिणाम त्यांच्या फलधारणेवर होणार असून शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होणार हे निश्चित.
लागवडीतील अंतर वाढले
४ऐन पेरणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे टाळले. गत तीन वर्षांपासून पेरणीच्या काळात पावसाच्या दडीचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. यामुळे जिह्यात आजच्या घडीला केवळ २.८६ लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने सुमारे महिनाभराची दडी मारल्याने विविध पिकातील लागवडीचे अंतर वाढणार असल्याचे चित्र आहे. याचा परिणात पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होणार आहे.
जिल्ह्यात केवळ २६ टक्के पावसाची नोंद
४जून महिन्यापासून पावसाला प्रारंभ झाला असला तरी जिल्ह्यात आजपर्यंत केवळ २५.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस अत्यल्प असून आणखी पावसाची गरज आहे. सोमवारी सकाळी व रविवारी रात्री काही भागात आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवणी मिळाली. पाण्याची पातळी वाढण्याकरिता व पिकांची योग्य वाढ होण्याकरिता पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत.