दारूसह ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: July 24, 2015 01:53 IST2015-07-24T01:53:14+5:302015-07-24T01:53:14+5:30

दारूबंदीच्या निर्णयाला काळ लोटला; पण गांधी जिल्ह्यातील दारू हद्दपार होताना दिसत नाही.

An amount of Rs 3.87 lakh was seized | दारूसह ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

दारूसह ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

आॅपरेशन वॉश आऊट : शहर ठाणे व पोलीस मुख्यालयाची कारवाई
वर्धा : दारूबंदीच्या निर्णयाला काळ लोटला; पण गांधी जिल्ह्यातील दारू हद्दपार होताना दिसत नाही. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशावरून शहरात ‘आॅपरेशन वॉश आऊट’ राबविले जात आहे. यात आठवड्यातून किमान एक-दोन वेळा पोलिसांद्वारे आनंदनगर, पुलफैल भागात ही कारवाई केली जात आहे; पण तेथे प्रत्येक कारवाईत जवळपास तेवढेच साहित्य व दारू आढळून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात गुरूवारी आनंदनगर, पुलफैल व इतवारा परिसरात आॅपरेशन वॉश आऊट राबविण्यात आले. पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे, व्ही.आर. मगर, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस मुख्यालयाचे ४५ कर्मचारी यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. यात रेल्वेलाईन भागात जमिनीत गाडून असलेले गावठी दारू गोळण्याकरिता तयार केलेले रसायन व भट्टी साहित्य आढळून आले. कारवाईत दारू गाळणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी सडवा रसायन, मोहा दारू तसेच दारूच्या भट्ट्या व साहित्य नष्ट करण्यात आल्या.
या कारवाईत २०० लिटरचे २३ लोखंडी ड्रम, १०० लिटरचे २५ प्लास्टिकचे ड्रम आणि १२ काळ्या बुडाचे लोखंडी ड्रम, दारूभट्टीचे इतर साहित्य, सरपण आदी साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय एकूण १० हजार ७०० लिटर रसायन, सडवा व दारू नष्ट करण्यात आली. दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये ३ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)
दररोज निघते लाखो लिटर दारू
शहरातील आनंदनगर, पूलफैल आणि इतवारा परिसरात शहर पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे जवळजवळ दररोजच आॅपरेशन वॉश आऊट अंतर्गत कारवाई केली जाते. नित्यनेमाने होत असलेल्या या कारवाईमध्ये तेवढेच साहित्य जप्त होत असून सडवा, रसायन व दारू नष्ट केली जाते. असे असले तरी दररोज तेवढेच साहित्य पुन्हा आढळून येत असल्याने लाखो लिटर दारू गाळल्या जात असल्याचेच दिसते. या प्रकारावरून कारवाईची भीतीच परिसरात राहिली नसल्याचे दिसून येते. यासाठी कठोर उपाययोजना करणेच अगत्याचे झाले आहे.

Web Title: An amount of Rs 3.87 lakh was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.