भूखंडाअभावी रखडले घरकुलांचे वाटप
By Admin | Updated: December 21, 2014 23:03 IST2014-12-21T23:03:16+5:302014-12-21T23:03:16+5:30
प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने घरकूल योजना राबविण्यात येत आहे. वर्धेत मात्र सन २०१४ मध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लाभार्थी व योजनेचा

भूखंडाअभावी रखडले घरकुलांचे वाटप
१,८४७ पैकी १,१३६ घरकूल मंजूर : लाभार्थ्यांची यादी वाढीवरच; मात्र जागेच्या अटीमुळे अडचण
रूपेश खैरी - वर्धा
प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने घरकूल योजना राबविण्यात येत आहे. वर्धेत मात्र सन २०१४ मध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लाभार्थी व योजनेचा निधी असताना केवळ बांधकामाकरिता भुखंड नसल्याच्या कारणाने अनेकांना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात या वर्षात इंदिरा आवास योजनेत १ हजार ८४७ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने योग्य लाभार्थ्यांचा शोध घेत त्यांना घरकूल देण्याची प्रक्रिया सुरू झाली. जि.प.च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजवंतांना घरकूल देण्यात आले. या योजनेत कार्यालयात दाखल झालेल्या अर्जानुसार एकूण १ हजार १३६ गरजवंतांना घरकूल मिळाले. योग्य लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण झाल्यानंतरही ७११ घरकुल शिल्लक राहत आहेत. ते घरकूल गरज असलेल्या जिल्ह्यांना देण्याबाबत जिल्हा परिषदेच्यावतीने वरिष्ठांपर्यंत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
जिल्ह्यात योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी मिळत नाही असेही नाही. ज्यांनी अर्ज सादर केला त्यांच्या नावाने गावात जागा नसल्याने या योजनेचा लाभ त्यांना देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिल्लक असलेले घरकूल परत जाण्याच्या मार्गावर आहेत. यावर मार्ग काढण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने काही उपाय करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. घरकुलाचा लाभ देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळवून गावठाणावर जागा विकत घेत घरकुल देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे. तसा प्रस्तावही राज्याच्या सचिवालयातून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर विचारमंथनही सुरू असल्याची माहिती आहे.
जागेकरिता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदानाचे प्रयत्न
वर्धा जिल्ह्यात जागा नसल्याच्या कारणाने घरकुल बांधकाम रखडले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. घरकुल बांधकामाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान घेत लाभार्थ्यांना गावठाणावर उपलब्ध असलेली जागा विकत घेऊन घरकुल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिली.
इतर मागासवर्गीयांची प्रतीक्षा यादी मोठी
घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता असलेली इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. यात जागा नसल्याच्या कारणामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणे शक्य नाही. तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांनाही गरज असताना जागा नसल्याच्या कारणाने घरकुल मिळणे कठीण झाले आहे. यात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर होण्याकडे साऱ्याच लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.