आर्वी नाक्याच्या थांब्याची एसटीला अॅलर्जी
By Admin | Updated: March 31, 2017 01:57 IST2017-03-31T01:57:06+5:302017-03-31T01:57:06+5:30
स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही.

आर्वी नाक्याच्या थांब्याची एसटीला अॅलर्जी
विद्यार्थ्यांचे हाल : उन्हापासून बचावासाठी घ्यावा लागतो दुकानांचा आसरा
वर्धा/आकोली : स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही. यामुळे विद्यार्थ्यांची भर उन्हात होरपळ होत आहे. प्रवासी निवारा नसल्याने दुकानांचा आधार घ्यावा लागतो वा पायी मुख्य बसस्थानकावर पोहोचावे लागते. थांबा असताना एसटीला आर्वी नाक्यावर थांबण्याची अॅलर्जी असल्याचेच दिसते.
वर्धा ते आर्वी मार्गावर शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करतात. आंजी, खरांगणा, येळाकेळी, सुकळी (बाई) या गावातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता बसने वर्धा गाठतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी आर्वी नाका परिसरातील लोक महाविद्यालय, न्यू आर्टस कॉलेज, पिपरी (मेघे) येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे प्रवास भाड्याला पैसे राहत नाहीत. यामुळे त्यांना बसवर विसंबून राहावे लागते. कॉलेज संपल्यानंतर जवळचा थांबा म्हणून विद्यार्थी आर्वी नाक्यावर येतात.
वर्धा आगारातून सुटणाऱ्या बसेस आर्वी नाका थांब्यावर न थांबता सुसाट निघून जातात. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एक तर येथे हक्काचा प्रवासी निवारा नाही. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना दुकानांचा आधार घेत दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागते.
दुपारी आर्वी नाक्यावर गावाकडे जाण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळीच घरी जाता येते. गोरगरीबांची ही मुलं पैसे नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करू शकत नाहीत. यामुळे काही विद्यार्थी नाक्यापासून पायी भर उन्हात बसस्थानक गाठतात. पोटात अन्नाचा कण नसताना विद्यार्थ्यांची पायीवारी दमछाक करणारी ठरते. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वाहकांना आर्वी नाक्यावर बस थांबविण्याच्या सूचना देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)
दोन मार्गांना दिला जातो वेगवेगळा न्याय
वर्धा बसस्थानकातून दिवसभर आर्वी आणि नागपूरसाठी बसेस सोडल्या जातात. यातील नागपूरकडे जाणाऱ्या बसेस पोस्ट आॅफीस, आरती चौक व धुनिवाले मठ या भागात प्रवासी असल्यास थांबविल्या जातात; पण आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका, कारला रोड या थांब्यांवर थांबत नसल्याचे दिसते. यामुळे दोन मार्गांना वेगवेगळा न्याय दिला जात असल्याचे दिसते. काही दयाळू वाहक बस थांबवून विद्यार्थी घेतात तर काही बस रिकामी असताना पुढे जातात. यामुळे संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामंडळाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.