सर्वदूर पाऊस; वाघाडी नदीला पूर

By Admin | Updated: July 16, 2014 00:19 IST2014-07-16T00:19:10+5:302014-07-16T00:19:10+5:30

पावसाळा सुरू झाला. पावसाळ्याच्या पहिल्या रोहिणी नक्षत्रापासून प्रतीक्षा असलेला पाऊस जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झाला. पावसाची सर्वांना प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांसह सारेच सुखावले.

All rain; Waghadi river floods | सर्वदूर पाऊस; वाघाडी नदीला पूर

सर्वदूर पाऊस; वाघाडी नदीला पूर

मंगळवारी १४९.०८ मि.मी. पावसाची नोंद : वाघाडी नदीत ४० मेंढ्या व १२ घोडे वाहून गेले
वर्धा : पावसाळा सुरू झाला. पावसाळ्याच्या पहिल्या रोहिणी नक्षत्रापासून प्रतीक्षा असलेला पाऊस जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झाला. पावसाची सर्वांना प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांसह सारेच सुखावले. रात्रीपासून आलेल्या पावसामुळे काही भागातील नाल्यांना पूर आला असून कमी उंचीच्या पुलामुळे रस्ते बंद झाले होते. समुद्रपूर तालुक्यात वाघाडी नदीला आलेल्या पुरात एका गुराख्याच्या ४० मेंढ्या आणि १२ घोडे वाहुन गेल्याची माहिती आहे. यासह अन्य मोठी घटना असल्याचे ऐकिवात नाही. स्प्रिकलरच्या सहायाने पिके जगविणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने फावले आहे; मात्र पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी करून ती उगवून करपलेल्या काही शेतकऱ्यांना या पावसाचा कुठलाही लाभ नसल्याचे चित्र आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही सुरूच होता. यात मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १४९.८ मीलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. यात सर्वांधिक पाऊस समुद्रपूर तालुक्यात ५०.४ मीलिमीटर झाला तर दुसऱ्या क्रमांकावर हिंगणघाट तालुक्यात ३४ मीलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस आर्वी व आष्टी तालुक्यात झाल्याचे सांगण्यात आले आहे. वर्धा शहरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८५.२ मीलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस झालेल्या समुद्रपूर तालुक्यातील अनेक नाल्यांना पूर आला. यामुळे कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक रस्ते बंद झाले. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. यवतमाळ जिल्ह्यातून चाऱ्याच्या शोधात आलेल्या एका गुराख्याच्या ४० मेंढ्या आणि १२ घोडे वाहुन गेल्याची माहिती तहसीलदार पुष्पलता कुंभरे यांनी दिली. रोहीणी, मृग व आर्द्रा या पाऊस येणाऱ्या तिनही नक्षत्रात पावसाचा थेंबही पडला नसल्याने मोठे नुकसान झाले. या नक्षत्रात काही भागातच पावसाने नाममात्र हजेरी लावली. यामुळे मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या फसल्या. पुनर्वसू नक्षत्रही कोरडे जाण्याच्या मार्गावर असताना रात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर पाऊस कायम होता. या संततधार पावसामुळे आतापर्यत न आलेल्या पावसाची कमी भरुन निघेल असे वाटू लागले आहे. हा पाऊस असाच चार-पाच दिवस असल्यास धरणाच्या खाली गेलेल्या पातळीत सुधारणा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. पावसामुळे सकाळपासून जनजीवन प्रभावित झाल्याचे चित्र जिल्ह्यात होते. अनेक ठिकाणी नाल्यांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद झाले होते. सकाळच्या शाळाही उशिरा भरल्या. या पावसाने सर्वांच्या कामात काही प्रामणात व्यत्यय आला असला तरी साऱ्यांच्या चेहऱ्याचर अखेर पाऊस तर आला याचा आनंद झळकत आहे. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी सायंकाळी थांबला. यामुळे नागरिकांनी छत्री घेऊन घराबाहेर पडून महत्त्वाची कामे आटोपली.(लोकमत न्यूज नेटवर्क)
लाल नाला प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले
समुद्रपूर तालुक्यात रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. कोरा येथील लाल नाला प्रकल्पाची पातळी २ मीटरने वाढल्याचे दोन दरवाजे उघडले. डोंगरगाव आणि आसोला गावाला सतर्कतेचा इशारा दिला. गणेशपूर आणि जाम येथे घराची पडझड झाली.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथील गुराख्यांच्या ४० मेंढ्या आणि १२ घोडे वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेले. लसनपूर जवळ नाला ओव्हरफ्लो झाल्याने समुद्रपूर-गिरड मार्ग, दुपारी १ वाजेपर्यंत वायगाव (गोंड) मार्ग बंद झाला होता. समुद्रपूर, वायगाव(ह.), मांडगाव येथील काही घरात पाणी शिरले होते.
हिंगणघाट आगाराच्या दहा बसफेऱ्या बंद
सोमवारी रात्रीपासून येत असलेल्या पावसामुळे उमरेड व नंदोरी मार्गावरील बसफेऱ्या हिंगणघाट आगाराच्या बसफेऱ्या बंद झाल्या आहेत. या मार्गावर असलेल्या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने तो बंद करण्यात आला आहे. या मार्गावर आगाराच्या सुमारे एका दिवसात दहा बसफेऱ्या होतात. शिवाय उमरेड आगाराच्या गाड्याही बंद असल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला आहे.
वर्धा ते समुद्रपूर मार्ग बंद
समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी पुलावरून चार ते पाच फुट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद आहे. समुद्रपूर येथे शाळेत जाणारी मुले, कर्मचारी यांना आज कामावर जाता आले नाही. वर्धा ते समुद्रपूर बसेसही मांडगाववरून परत आल्या़ आर्वी ते चिमूर बसही मांडगाववरून परत वर्धेला गेली. रस्ता बंद असल्याने शिक्षक येऊ शकले नाही़ रात्री पासून पाऊस सुरू आहे.शेडगाव नदीच्या पुलावरील पाणी वाहत असल्याने समुद्रपूर वर्धा (मांडगाव मार्गे) वाहतूक ठप्प झाली. तसेच नदीपासून १ किमी अंतरापर्यंत शेतात पाणी शिरले होते.
आठवडी बाजारातही शुकशुकाट
मंगळवारी मांडगाव येथील आठवडी बाजार भरतो; पण पावसामुळे बाजारात एक-दोन दुकानेच होती़ ग्रामीण भागात बाजाराच्या दिवसात आठवड्याच्या साहित्याची खरेदी करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न असतो; मात्र पावसामुळे आठवडी बाजारात दुकानेच लागली नाही. बाजार भरणार नसल्याचे चित्र गावात असले तरी नागरिकांच्या चेहऱ्यावर पाऊस आल्याचा आनंद मात्र झळकत होता.

Web Title: All rain; Waghadi river floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.