दारूची वाहतूक करणारे अटकेत
By Admin | Updated: February 15, 2016 02:21 IST2016-02-15T02:21:48+5:302016-02-15T02:21:48+5:30
नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूरकडे दुचाकीने दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याजवळून ४७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दारूची वाहतूक करणारे अटकेत
४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त : तावी गावातील महिलांचा पुढाकार
गिरड : नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूरकडे दुचाकीने दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याजवळून ४७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सकाळी १० वाजता समुद्रपूर तालुक्यातील तावी येथे ही कारवाई करण्यात आली. किरण श्रीरामे (४९) रा. गिरड व दिवाकर चौधरी (४०) रा. ताडगाव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तावी येथील बचतगटातील शेकडो महिला व पुरूष मुख्यमार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात एकत्रित आले होते. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सिर्सी येथून किरण श्रीरामे व दिवाकर चौधरी हे एमएच ४९ जी ५३५३ या क्रमांकाच्या दुचाकीने देशी दारू घेऊन चंद्रपूर जिल्ह्याकडे जात होते. अवैध दारूची वाहतूक सुरू असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. महिलांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गिरड पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस त्वरीत तावी येथे पोहोचले. पोलिसांनी १२ हजार ५०० रूपयांची देशी दारू व ३५ हजार रूपयांची दुचाकी, असा ४७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गिरड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक थोटे यांच्या मार्गदर्शनात गजानन घोडे, नितीन नागोसे, रवी घाटुर्ले, रहीम शेख आदींनी केली. यावेळी मोहगावच्या सरपंच रंजना मसराम, उपसरपंच कैलास नवघरे, सदस्य सविता घोटेकर, सपना आडकिने, कल्पना नेहारे, अर्चना राऊत, मनीषा शेवळे, विद्या परचाके, सविता शेळके, बेबी गायकवाड, संगीता लाटनकर आदी महिलांची उपस्थिती होती.(वार्ताहर)