ऐश्वर्या महाजन जिल्ह्यात पहिली

By Admin | Updated: June 18, 2014 00:19 IST2014-06-18T00:19:33+5:302014-06-18T00:19:33+5:30

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ यात रत्नीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या अनिल महाजन हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिने ९८ टक्के गुण प्राप्त केले

Aishwarya is the first in Mahajan district | ऐश्वर्या महाजन जिल्ह्यात पहिली

ऐश्वर्या महाजन जिल्ह्यात पहिली

वर्धा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ यात रत्नीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या अनिल महाजन हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिने ९८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. द्वितीय स्थानावर सुशील हिंमतसिंगका विद्यालयाचा विद्यार्थी आशुतोष सुरेश जवादे असून त्याने ९७ टक्के गुण प्राप्त केले तर तिसऱ्या स्थानावर सेंट जॉन हायस्कूल हिंगणघाटचा विद्यार्थी पंकज काटकर असून त्याने ९६.२० टक्के गुण प्राप्त केलेत.
गत वर्षीप्रमाणे यंदाही मुलीच अव्वल ठरल्या़ जिल्ह्याच्या निकालात यंदा भर पडली असून ८०.२७ टक्के लागला आहे. यात मुलीच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणात वाढ झाली असून मुलांपेक्षा मुलीच समोर असल्याचे निकालातून दिसून आले. शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने मुलांना निकालाची आतुरतेने प्रतीक्षा होती़ ती मंगळवारी संपली. नागपूर विभागाचा निकाल दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. आपला निकाल माहिती करून घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील एमकेसीएलच्या संगणक केंद्रांवर एकच गर्दी केली होती़ जिल्ह्यातील ७६४ शाळांतून १९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होता़ यात १९ हजार १६३ विद्यार्थ्यांनी ७४ परीक्षा केंद्रांतून परीक्षा दिली. यातील ६९ नियमित आणि ५ परीक्षा केंद्र जुन्या अभ्यासक्रमासाठी होते. यातील १५ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले तर ३ हजार ७८० विद्यार्थांना उत्तीर्ण होता आले नाही. यात ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवित प्राविण्यासह उत्तीर्ण होणारे २ हजार ३९९ विद्यार्थी आहेत. ग्रेड वनमध्ये ५ हजार ४२९ विद्यार्थी, गे्रड टु मध्ये ६ हजार १६२ विद्यार्थी असून केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ३९३ आहे. जुन्या अभ्यासक्रमात ३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले. पैकी ३ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रेड वनमध्ये ५, गे्रड टु मध्ये १० तर ६९५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमामध्येही मुलींचीच सरशी दिसून येते. जुन्या अभ्यासक्रमात २ हजार ३१६ मुलांनी परीक्षा दिली. यात ३६७ मुले उत्तीर्ण झाली. १ हजार ४११ मुलींपैकी ३४३ मुली उत्तीर्ण झाल्यात. जुन्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण मुलांची १५.८५ तर मुलींची टक्केवारी २४.३१ आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Aishwarya is the first in Mahajan district