गहू, चणा उत्पादनाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:48+5:30

गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे.

Agriculture Department is unaware of wheat, gram production | गहू, चणा उत्पादनाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

गहू, चणा उत्पादनाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

ठळक मुद्देपीक कापणीचा प्रात्यक्षिक अहवाल खोळंबला

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात भाजीकोंडी होऊ देणार नाही असे म्हणत स्वत:ची पाठ थोपाटून घेणाऱ्या कृषी विभागाचा भोंगळ कारभारच या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून येत आहे.
गत वर्षी तुरीची ६९ हजार ५०० हेक्टरवर, गहू १७ हजार २७२ हेक्टर तर ३९ हजार ९८० हेक्टरवर चण्याची लागवड झाली होती. तर यंदाच्या वर्षी ६० हजार १३२ हेक्टरवर तुरीची लागवड झाली. शिवाय २२ हजार २१७ हेक्टरवर गहू आणि ४१ हजार ७१४ हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. परंतु, चणा व गहू या पिकाच्या कापणी प्रयोगाची अंतीम आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झालेला नसल्याने यंदा गहू आणि चण्याचे जिल्ह्यात नेमके किती उत्पादन होईल यापासून कृषी विभाग अनभिज्ञ आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितल्या जात आहे. गत वर्षी हेक्टरी १,१६८ किलो तर यंदाच्या वर्षी हेक्टरी १,२६३ किलो तुरीचा उतारा आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

९,३६८ हेक्टरने तुरीचे क्षेत्र घटले
गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९ हजार ३६८ हेक्टरने तूर पिकाचे क्षेत्र घटले आहे. तर ४ हजार ९४५ हेक्टरने गहू आणि १ हजार ७१६ हेक्टरने चण्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचे नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मळणी शिल्लक
सध्यास्थितीत बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या तूर, गहू व चणा या शेतमालाची शिल्लक आहे. असे असले तरी जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे नेमके किती उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नाही. त्यामुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यंदाच्या वर्षीचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. परंतु, त्याची पूर्ण माहिती अद्यापही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे उत्पादन नेमके किती झाले हे अद्यापही अस्पष्ट आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्त्वास जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. लॉकडाऊन संपल्यावर आकडेवारी अपडेट होईल.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: Agriculture Department is unaware of wheat, gram production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती