शेतीविषयक अद्ययावत ज्ञान आवश्यक
By Admin | Updated: March 22, 2015 01:45 IST2015-03-22T01:45:02+5:302015-03-22T01:45:02+5:30
आजच्या शेतकऱ्यांनी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे. विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्या ....

शेतीविषयक अद्ययावत ज्ञान आवश्यक
वर्धा : आजच्या शेतकऱ्यांनी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे. विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे दिसते. शेतकरी हा सुखी समाधानी होऊन देशाचा खरा आधार स्तंभ व समृद्ध बनावा यासाठी प्रशिक्षण वर्ग आवश्यक असल्याचे मत जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांनी व्यक्त केले.
गतिमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपिनकुमार राठोड, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी मोर्घे, मुडे, तेलंगे उपस्थित होते. यानंतर बोलताना राठोड म्हणाले, शेतकऱ्याला संकटाशी लढण्याची जिद्द व ताकद निर्माण व्हावी याकरिता योजना आहेत. या प्रशिक्षणामार्फत अद्यावत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवाला कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कडधान्य विकास कार्यक्रम तसेच वी.आय.आय.डी.पी. अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमात एकुर्लीचे सरपंच भास्कर वरभे, पं.स. सदस्य विमल वरभे, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, सरपंच अतुल तिमांडे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)